शेअर बाजारात खळबळ! निफ्टी २५०००च्या खाली, सेन्सेक्स ५०० अंकांनी कोसळला
Stock Market Crash
Stock Market Crash : शेअर बाजारात आज शुक्रवारी सकाळपासूनच प्रचंड अस्थिरता पाहायला मिळाली. बँकिंग, आयटी, रिअल इस्टेट, ऑटो आणि धातू क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीचा मारा झाला आणि त्यामुळे बाजार घसरतच गेला. निफ्टीने थेट २५००० च्या खाली घसरण करत गुंतवणूकदारांची चिंता वाढवली.
हे पण वाचा : गुंतवणूकदारांसाठी संधी! ‘या’ शेअरचा 5:1 स्टॉक स्प्लिट, तारीख जाहीर
सकाळी बाजार उघडताच निफ्टीने २५१०८ ची सुरुवात केली आणि काही वेळातच २५१४४ ची दिवसातील उच्चांक पातळी गाठली. मात्र ही तेजी फार काळ टिकली नाही. थोड्याच वेळात विक्रमी घसरणीचा सामना करत निफ्टी तब्बल २०० अंकांनी घसरला. दुसरीकडे, सेन्सेक्सनेही ५०० हून अधिक अंकांची घसरण नोंदवून ८१६७८ ची नीचांकी पातळी गाठली.
अॅक्सिस बँक, एसबीआय लाईफ, बीईएल आणि भारती एअरटेल हे शेअर्स आजच्या घसरणीला जबाबदार ठरले. अॅक्सिस बँकेने आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ४ टक्क्यांची घट जाहीर केली, आणि त्यामुळे गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केली. परिणामी, कंपनीचा शेअर तब्बल ६.४ टक्क्यांनी घसरला.
या सगळ्या नकारात्मक घडामोडींमध्ये फक्त एकट्या विप्रोने आपले अस्तित्व टिकवले. चांगल्या तिमाही निकालांच्या आधारावर तिचा शेअर थोडाफार वधारला, पण या एका शेअरच्या भरवश्यावर संपूर्ण बाजार सावरणे शक्य झाले नाही.
हे पण वाचा : बजाज हाउसिंग फायनान्सला तुफान अपसाईड! 43% रिटर्न मिळण्याची शक्यता
विशेष म्हणजे जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत येत असताना भारतीय बाजारात घसरण झाल्याचे चित्र दिसून आले. अमेरिकेतील रोजगारवाढीचे आकडे आणि किरकोळ विक्रीत वाढ झाल्यामुळे तिकडचा गुंतवणूकदार सध्या सकारात्मक मूडमध्ये आहे. मात्र भारतात मात्र गुंतवणूकदार सावध आणि गोंधळलेले दिसत आहेत.
तांत्रिक विश्लेषकांच्या मते, निफ्टीने आज २५००० ची अत्यंत महत्त्वाची पातळी तोडली आहे आणि येत्या काही सत्रांमध्ये ही घसरण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. निफ्टी २४८०० पर्यंत खाली जाऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
