कमकुवत निकाल असूनही Tata Tech चे शेअर्स उसळले; गुंतवणूकदारांसाठी संधी?
Tata Technologies Stock
Tata Technologies Stock : शेअर बाजारात सध्या एक रंजक चित्र पाहायला मिळतंय. इंजिनीअरिंग रिसर्च आणि डेव्हलपमेंट (ER&D) क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचे निकाल अपेक्षेपेक्षा कमकुवत आले असतानाही त्यांच्या शेअर्सचा भाव मात्र वरच चाललाय. टाटा टेक्नॉलॉजीज, टाटा एलेक्सी आणि एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (LTTS) यांचे शेअर्स गेल्या काही दिवसांत वाढले आहेत, आणि हे नेमकं का घडतंय, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
हे पण वाचा : ५ दिवसांत ५०% पेक्षा अधिक उसळी! Sterlite Tech शेअर ७५ वरून ११४ रुपयांवर
टाटा एलेक्सीने सुमारे ४ टक्क्यांची वाढ नोंदवली असून, टाटा टेक्नॉलॉजीजचा शेअर २ टक्क्यांनी आणि एलटीटीएसचा सुमारे १.५ टक्क्यांनी वधारला आहे. विशेष म्हणजे या तीनही कंपन्यांच्या महसुलात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घट झाली आहे. मात्र तरीही गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास ढळलेला नाही.
या कंपन्यांचा परफॉर्मन्स पाहिला तर, टाटा एलेक्सीचा कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ३.९ टक्क्यांनी घसरला, टाटा टेकचा ४.६ टक्क्यांनी आणि एलटीटीएसचा ४.२ टक्क्यांनी. तरीही बाजाराने या आकड्यांवर फारसा नकारात्मक प्रतिसाद दिला नाही. यामागे दोन मुख्य कारणं आहेत — व्यवस्थापनाची सकारात्मक भुमिका आणि भविष्यातील मार्गदर्शन (गायडन्स).
टाटा एलेक्सीने स्पष्ट केलं आहे की कंपनीला आपल्या दोन प्रमुख व्यवसाय क्षेत्रांमध्ये – ‘ट्रान्सपोर्टेशन’ आणि ‘मीडिया अॅन्ड कम्युनिकेशन’मध्ये दुसऱ्या तिमाहीपासून सुधारणा अपेक्षित आहे. त्याचबरोबर मार्जिन्समध्येही हळूहळू वाढ होईल, असं व्यवस्थापन म्हणतं.
टाटा टेक्नॉलॉजीजने जरी पहिल्या तिमाहीत अपेक्षित कामगिरी केली नसली, तरी कंपनीने स्पष्टपणे सांगितलं आहे की संपूर्ण आर्थिक वर्षभरात महसुलात घसरण होणार नाही. दुसऱ्या तिमाहीतच स्थितीत सुधारणा होईल आणि वर्षाच्या उत्तरार्धात चांगली कामगिरी होईल, असा ठाम विश्वास कंपनी व्यक्त करते. मार्जिन्स १८ टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू असून भविष्यात २० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचं लक्ष्य आहे.
हे पण वाचा : Hexaware ची स्फोटक डील! शेअर्समध्ये उसळी; गुंतवणूकदारांमध्ये आशावाद
LTTS ने सुद्धा आपली डबल डिजिट ग्रोथची उद्दिष्टं कायम ठेवली आहेत. कंपनीने EBIT मार्जिन सुधारण्यासाठी दुसऱ्या सहामाहीत अधिक चांगली कामगिरी होईल असं सांगितलं आहे.
या तिन्ही कंपन्यांची एक सामायिक गोष्ट म्हणजे — व्यवस्थापनाचा आत्मविश्वास, स्पष्ट दिशा आणि भविष्यकाळात सुधारणा घडवून आणण्याची तयारी. त्यामुळेच गुंतवणूकदारही कंपन्यांच्या तात्पुरत्या अडचणींवर नव्हे, तर दीर्घकालीन दृष्टिकोनावर विश्वास दाखवत आहेत.
