सगळं उलटलं! Tesla शेअर्स कोसळले, Elon Musk यांना मोठा आर्थिक फटका
Tesla Share Price Drop
Tesla Share Price Drop : एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीसाठी गुरुवार, 24 जुलै 2025 हा दिवस अत्यंत निराशाजनक ठरला. अमेरिकी शेअर बाजारात वॉल स्ट्रीटवर टेस्लाचे शेअर्स 9 टक्क्यांहून अधिक घसरले, त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर विक्रीचा मार्ग धरला. कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीच्या कमकुवत आर्थिक कामगिरीने गुंतवणूकदारांचा विश्वास डळमळीत केला आहे.
हे पण वाचा : शेअर बाजार घसरतोयच! शुक्रवारीही बाजारात मोठी घसरण; गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण
टेस्लाने अलीकडेच एप्रिल-जून 2025 या कालावधीतील तिमाही निकाल जाहीर केले. यात कंपनीचा निव्वळ नफा 16 टक्क्यांनी कमी झाला असून महसूल 22.5 अब्ज डॉलरवर घसरला, जो मागील वर्षी याच तिमाहीत 25.5 अब्ज डॉलर होता. ही आकडेवारी जाहीर होताच, गुंतवणूकदारांनी बाजार उघडताच विक्रीचा सपाटा लावला.
गुरुवारी टेस्लाचा शेअर $301 पर्यंत खाली आला. एकट्या बुधवारी आफ्टर-मार्केट ट्रेडिंगमध्येच 4.4% घसरण झाली होती. एलन मस्क यांची राजकीय भूमिकांमधील सक्रियता, ग्राहकांमध्ये वाढता नाराजीचा सूर आणि इतर इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांकडून होत असलेली आक्रमक स्पर्धा, हे टेस्लाच्या अडचणी वाढवणारे घटक ठरत आहेत.
अर्थव्यवस्थेतील मंदीच्या पार्श्वभूमीवर आणि दररोज नव्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करत असताना टेस्लाच्या खर्चात झपाट्याने वाढ झाली आहे. नफ्यात घट झाल्याने कंपनीवरील गुंतवणूकदारांचा विश्वास हलत आहे. मागील पाच ट्रेडिंग सत्रात टेस्लाचा शेअर जवळपास 5.6% ने खाली आला आहे. संपूर्ण 2025 वर्षात आतापर्यंत शेअर 20% नी घसरला आहे, जो गुंतवणुकीसाठी धोक्याचा इशारा मानला जातो.
हे पण वाचा : Wipro शेअरवर मोठा कॉल! नुवामा ब्रोकिंगने दिलं ताजं टार्गेट, गुंतवणूकदार सतर्क!
या घसरणीमुळे टेस्लाचे बाजार भांडवल आता 1.07 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत खाली आले असून कंपनी जगातील सर्वात मोठ्या 10 कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडली आहे. आता ती 11 व्या क्रमांकावर असून बर्कशायर हॅथवेने तिला मागे टाकले आहे.
