आयटीआर भरणार असाल तर ‘ही’ कागदपत्रं ठेवा तयार, नाहीतर भरावा लागू शकतो दंड! वाचा सविस्तर
ITR Filing Documents List
ITR Filing Documents List : कर भरायचा काळ आला की अनेकांना अस्वस्थता वाढते. कधी कोणता फॉर्म भरायचा, कोणते कागदपत्रं लागतात, कुठे माहिती मिळते – अशा प्रश्नांनी सामान्य पगारदार माणूस गोंधळून जातो. यंदा थोडा दिलासा मिळाला आहे कारण सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसनं (CBDT) ITR भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. पण याचा लाभ फक्त त्यांच्या खात्यांचं ऑडिट होणार आहे अशा करदात्यांनाच होतो. पगारदार व्यक्ती, पेन्शनर्स यांना मात्र मूळ मुदतीनुसार म्हणजे ३१ जुलैपर्यंतच ITR भरावा लागणार आहे.
ITR भरण्यापूर्वी काही महत्त्वाची कागदपत्रं तयार ठेवणं अत्यावश्यक आहे. ही कागदपत्रं तुमचं उत्पन्न, कर वजा होणारे घटक आणि अन्य आर्थिक माहिती व्यवस्थित मांडायला मदत करतात. त्याशिवाय चुकांपासून बचाव होतो.
फॉर्म १६ – पगारदारांसाठी अत्यावश्यक:
तुमच्या नोकरीच्या संस्थेने दिलेला फॉर्म १६ हा तुमच्या पगाराची आणि TDS ची सविस्तर माहिती देतो. तुम्ही किती पगार मिळवला, त्यावर किती कर कपात झाली याची तपशीलवार माहिती यात असते. ITR फॉर्म भरताना याचा आधार घेतल्यास तुमच्याकडून चुकीची माहिती भरली जाण्याची शक्यता कमी होते.
फॉर्म १६A, १६B, १६C आणि १६D – उत्पन्नाच्या अन्य स्त्रोतांची माहिती:
जर तुम्हाला बँकेकडून व्याज, भाडं, विमा कमिशन किंवा संपत्ती विक्रीतून उत्पन्न मिळत असेल तर संबंधित फॉर्म (१६A ते १६D) आवश्यक असतात. उदाहरणार्थ, ५० हजारांपेक्षा जास्त भाडं मिळाल्यास फॉर्म १६C, स्थावर संपत्ती विक्रीसाठी फॉर्म १६B लागतो.
AIS, TIS आणि फॉर्म २६AS – डिजिटल ट्रॅकिंग साठी:
हे फॉर्म्स म्हणजे कर विभागाकडे तुमच्या उत्पन्नाची नोंद असलेली कागदपत्रं. फॉर्म २६AS मध्ये TDS आणि TCS ची माहिती, AIS मध्ये बँकेचं व्याज, शेअर व्यवहार, FD आदींची नोंद असते. TIS ही त्याची सरळ-सोपी झलक असते.
कॅपिटल गेन स्टेटमेंट – गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचं:
शेअर, म्युच्युअल फंड, मालमत्ता विक्रीतून झालेल्या नफ्याची माहिती कॅपिटल गेन स्टेटमेंटमधून मिळते. हे ब्रोकर किंवा म्युच्युअल फंड हाऊस देतात.
बँक स्टेटमेंट आणि व्याज प्रमाणपत्र:
सर्व बँक अकाउंट्सचं स्टेटमेंट आणि पोस्ट/बँकेच्या योजनांवर मिळालेल्या व्याजाचं प्रमाणपत्र ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे ITR मध्ये कोणतीही माहिती सुटणार नाही.
जर तुमच्याकडे विदेशी कंपन्यांचे शेअर्स किंवा तिथे बँक अकाउंट असेल, किंवा तुम्ही भारतीय अनलिस्टेड कंपनीचे शेअर्स ठेवले असतील, तर त्याची माहितीही स्पष्टपणे द्यावी लागते. ही माहिती दिली नाही तर पुढे चौकशी होऊ शकते.
