शेअर बाजारात सलग 4 दिवसांची घसरण; गुंतवणूकदारांचे ₹13 लाख कोटी बुडाले!
Stock Market Crash India
Stock Market Crash India : भारतीय शेअर बाजाराने सलग चौथ्या दिवशीही घसरणीची नोंद केली आहे. मंगळवारी (२९ जुलै) बाजार सुरू होताच सेन्सेक्स सुमारे १८० अंकांनी घसरला, तर निफ्टी ५० मध्येही नकारात्मक कल दिसून आला. यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल १३ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य चारच दिवसांत वाया गेले आहे. गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा उमटल्यात, तर स्थानिक गुंतवणूकदार मात्र या घसरणीकडे संधी म्हणून पाहत आहेत.
बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स झपाट्याने खाली आला आणि गुंतवणुकीचे वातावरण तणावपूर्ण झाले. प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा ओघ सुरु झाला. विशेष म्हणजे, आज टाटा मोटर्स, रिलायन्स, कोटक बँक, ट्रेंट आणि भारती एअरटेल यांसारख्या काही शेअर्समध्ये तेजी दिसली, तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँक, टीसीएस, बीईएल, इन्फोसिस आणि इटर्नल यांच्यात मोठी घसरण नोंदवली गेली.
परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी एकट्या कॅश मार्केटमधून ६,१०० कोटी रुपयांची विक्री झाल्याने बाजाराचा ढासळता ट्रेंड अधिक गडद झाला. याउलट, देशांतर्गत गुंतवणूकदार (DIIs) मात्र सलग १६ व्या दिवशीही बाजारात सक्रिय राहून ६,८०० कोटी रुपयांची खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारात काही प्रमाणात स्थैर्य राखले जात आहे.
दरम्यान, औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीनेही चिंतेत भर घातली आहे. जून महिन्यात औद्योगिक उत्पादन (IIP) केवळ १.५ टक्क्यांवर घसरले आहे, जे मागील १० महिन्यांतील नीचांकी स्तर आहे. खनिज क्षेत्रातील मंदी आणि उत्पादन उद्योगातील सुस्तावलेली गती यामुळे ही घट झाली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, याचा परिणाम देशाच्या आर्थिक धोरणांवर दिसून येईल.
जागतिक स्तरावरही अनिश्चितता आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी फक्त १०-१२ दिवसांची मुदत दिली आहे. या अल्टिमेटमचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरही झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती २.५ टक्क्यांनी वाढल्या असून, सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे.
हे पण वाचा : ‘या’ कंपन्या देणार करोडोंचा लाभांश! शेवटची खरेदी संधी गमावू नका; वाचा सविस्तर
आज एशियन पेंट्स, एलअँडटी आणि एनटीपीसी या मोठ्या कंपन्यांचे आर्थिक निकाल येणार आहेत. त्याचबरोबर बँक ऑफ इंडिया, वरुण बेव्हरेजेस आणि जीएमआर एअरपोर्ट्स या कंपन्यांच्या निकालांकडेही बाजाराचे लक्ष लागले आहे.
