तुमच्या कुंडलीत राहु-केतू दोष आहे का? मग भारतातील ‘या’ एकमेव मंदिरात मिळेल मुक्ती! जाणून घ्या कुठे आहे हे मंदिर?
भारतात असंख्य मंदिरे आहेत, पण काही मंदिरांची ओळख ही त्यांच्या अनोख्या धार्मिक शक्तींसाठी आहे. अशीच एक विशेष ओळख मिळवलेलं मंदिर म्हणजे आंध्र प्रदेशातील श्री कालहस्ती मंदिर. एक असं स्थान जेथे राहू आणि केतू ग्रहांचे दोष दूर करण्याची मान्यता आहे. अनेकांना वाटतं की राहू आणि केतू हे केवळ ग्रह नाहीत, तर आपलं नशीब उलथवून टाकणाऱ्या अदृश्य शक्ती आहेत. त्यांच्या कुंडलीतील अशुभ प्रभावामुळे जीवनात अडचणी, वाद, मानसिक तणाव, आर्थिक संकट आणि कौटुंबिक अशांती निर्माण होते. त्यामुळे ज्यांच्या जीवनात हा त्रास वारंवार जाणवतो, त्यांच्यासाठी श्री कालहस्ती हे मंदिर आशेचा किरण ठरते.
श्री कालहस्ती मंदिर
शास्त्रांनुसार, राहू आणि केतू या दोन्ही छाया ग्रहांच्या असंतुलनामुळे कालसर्प दोष तयार होतो, ज्यामुळे अनेक संकटं मागे लागतात. या दोषाचे परिणाम इतके खोल असतात की, ते व्यक्तीच्या यश, सुख आणि शांततेवर दीर्घकाळ प्रभाव टाकतात. अशा वेळी फक्त विधीपूर्वक पूजा आणि अचूक तीर्थस्थानात केलेल्या उपायांनीच समाधान मिळू शकतं, असं मानलं जातं. श्री कालहस्ती मंदिर याच कारणामुळे खास आहे, कारण हे भारतातील एकमेव असं प्राचीन मंदिर आहे, जिथे राहू आणि केतूची थेट पूजा केली जाते.
हे मंदिर तिरुपतीपासून काही अंतरावर असून दक्षिण भारतातील पंचतत्त्व लिंगांपैकी वायू तत्त्व मानलं जातं. याचा अर्थ असा की इथे साक्षात वाऱ्याच्या स्वरूपात शिवशक्तीची पूजा होते. विशेष बाब म्हणजे, येथे पूजेसाठी आलेल्या पुजाऱ्यांनाही मुख्य शिवलिंगाला स्पर्श करण्याची परवानगी नाही. भक्तांनी इथे येऊन ‘कालसर्प दोष निवारण पूजा’ केली, तर त्यांच्या कुंडलीतील राहू आणि केतूचा त्रास कमी होतो, अशी श्रद्धा आहे.
महाभारत काळातील कथा-
या मंदिराशी महाभारत काळातील एक गोष्टही जोडलेली आहे. म्हणतात, अर्जुनाने आपली शक्ती वाढवण्यासाठी इथे तप केला होता. मंदिरात सुमारे 4 फूट उंचीचं शिवलिंग आहे आणि वर्षभर लाखो भाविक इथे येऊन दोषमुक्त होण्यासाठी पूजा करतात. इतकंच नव्हे, तर मंदिराचं वार्षिक उत्पन्नही 100 कोटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगितलं जातं.
