इन्स्टाग्रामवर शालेय विद्यार्थीनीची अश्लिल स्टोरी लावणाऱ्या तरूणाला पोलिसांनी धाडलं कोठडीत
बारामती- आजकाल अल्पवयीन मुलांचा सोशल मीडियाचा वापर किती धोकादायक ठरतोय हे पुन्हा एकदा समोर आलंय. इन्स्टाग्रामवर पेज चालवणारी काही मुलं आपल्या आजूबाजूच्या मुलींना टार्गेट करतायत.
मुली सुरक्षित राहिल्या नाहीत, त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सतत घडतायत. यात सगळ्यात जास्त बळी पडतायत त्या अल्पवयीन मुली. ऑनलाइन अभ्यासाच्या नावाखाली मोबाईल हातात देणारे पालक आपली मुलं सोशल मीडियावर काय करतायत, कसं आभासी आयुष्य जगतायत याचा पत्ताच ठेवत नाहीत.
पण जेव्हा अशा धक्कादायक गोष्टी समोर येतात आणि मुलांचं बिंग फुटतं, तेव्हा सगळं काही हाताबाहेर गेलेलं असतं. असाच एक प्रकार बारामती तालुक्यातून उघडकीस आलाय.
बारामती तालुक्यात एका शाळकरी मुलीचा फोटो आणि त्यावर अश्लील मजकूर टाकून इन्स्टाग्रामवर स्टोरी व्हायरल करण्याची घटना घडली.
खोटं आयडी बनवून हे सगळं करणाऱ्या त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. चौकशीत त्यानं गुन्हा कबूल केला आणि अखेर माळेगाव पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन राजेंद्र क्षीरसागर (वय २१, राहणार ढाकाळे, ता. बारामती, जि. पुणे) असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे.
मुलीच्या वडिलांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर कुटुंबाचे फोटो शेअर केले होते. त्यातला एक फोटोचा स्क्रीनशॉट काढून पवननं नवं इन्स्टाग्राम आयडी बनवलं आणि नववीत शिकणाऱ्या त्या मुलीचा फोटो घेऊन त्यावर अश्लील, लज्जास्पद मजकूर लिहून तो व्हायरल केला.
सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांच्या सूचनेनुसार पोलीस नाईक संदीप सानप यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुक चालवणाऱ्या मेटा कंपनीच्या अमेरिकेतील ऑफिसशी संपर्क साधला.
तिथून मिळालेल्या माहितीचं तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी आरोपीचा शोध लावला. या यशानंतर पोलिसांनी मुलींना सावध राहण्याचं आवाहन केलंय. माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या एका गावात राहणारी ही नववीतली मुलगी आणि तिच्या फोटोवर तिच्या चारित्र्याची बदनामी करणारा अश्लील मजकूर लिहून इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकण्याचा प्रकार तिच्या कुटुंबाच्या लक्षात आला.
त्यानंतर मुलीच्या वडिलांनी माळेगाव पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि तपास पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्याकडे सोपवला गेला. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वैशाली पाटील यांनी तपास पथक तयार केलं.
आरोपीला बारामतीच्या कोर्टात हजर केलं तेव्हा त्याला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. पुढचा तपास आता सुरू आहे.
