October 30, 2026

Pune Rain Alert: 20 जून रोजी ‘या’ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा धोका! बघा यादी

0
Punelive24 News (1)

Pune Rain Alert :- राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीस काहीशा थांबलेल्या मान्सूनने आता वेग घेतला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा मारा सुरू आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागांत संततधार पावसाने उपस्थिती लावली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. २० जून रोजी हवामान विभागाने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागांत वीजेसह जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईला आजपासून सतर्कतेचा इशारा

मुंबई शहरात १९ जून रोजी पावसाचा जोर तुलनेने कमी होता.परंतु २० जूनपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सखल भागात पाणी साचणे, वाहतूक ठप्प होणे आणि उपनगरांत अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक ठरणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबईतील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

कोकणातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

कोकण परिसरात रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये संततधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून, तिथे यलो अलर्ट जारी केला गेला आहे. कोकणात वाऱ्याचा वेगही वाढला असून समुद्रकिनाऱ्याजवळील भागात उंच लाटा येण्याची शक्यता आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला गेला आहे.

मराठवाडा व विदर्भातील या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. विशेषतः लातूर, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी,छ. संभाजीनगर या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वाऱ्याच्या झंझावातासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकरी वर्ग आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

विदर्भात नागपूर, अकोला, यवतमाळ, वर्धा, अमरावती आणि गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्येही २० जून रोजी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पावसामुळे शेतीच्या कामांना गती मिळू शकते; मात्र तितकीच खबरदारीही आवश्यक आहे. या काळात वीज पडण्याच्या घटना वाढू शकतात म्हणून उघड्यावर काम करताना विशेष सतर्कता बाळगावी.

त्याचबरोबर नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याचे भाग असल्याने येथे पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. या भागात दरडी कोसळण्याचा धोका असतो, त्यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे.

Leave a Reply