October 29, 2026

Pune Tourism : सिंहगड, जेजुरी, पानशेत… पुणे दर्शन आता PMP बसने फक्त 500 मध्ये! कसं कराल बुकिंग?

0
Pune Live24

Pune Tourism:- पुणे आणि परिसरातील पर्यटनस्थळे पाहण्याची इच्छा असेल, पण योग्य मार्गदर्शन आणि प्रवासाची सुविधा नसेल, तर आता चिंता करण्याची गरज नाही. पीएमपी (PMP) तर्फे खास १० विशेष बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत, ज्या विकेंड आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी शहरातील प्रमुख पर्यटनस्थळांवर नेण्यासाठी धावतात.

या सेवेमुळे स्थानिक रहिवासी तसेच पुण्यात येणारे पर्यटक सहजतेने शहर आणि परिसरातील ऐतिहासिक, धार्मिक आणि निसर्गरम्य स्थळांना भेट देऊ शकतात. या विशेष बससेवांमध्ये हडपसर, स्वारगेट, पुणे स्टेशन आणि डेक्कन जिमखाना येथून सुरू होणाऱ्या विविध मार्गांवर ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि नैसर्गिक पर्यटनस्थळे समाविष्ट आहेत.

जसे की, सिंहगड, खडकवासला धरण, पानशेत धरण, जेजुरी, मोरगाव गणपती, थेऊर गणपती, त्रिवेणी संगम, भीमा कोरेगाव विजयस्तंभ, देहूगाव गाथा मंदिर, आणि पु. ल. देशपांडे गार्डन यांसारखी अनेक आकर्षक स्थळे या बससेवेच्या अंतर्गत कव्हर केली जातात.

या बस सेवेचे वैशिष्ट्ये

या बससेवांसाठी प्रवाशांना अधिक आरामदायक आणि माहितीपूर्ण अनुभव मिळावा म्हणून स्मार्ट वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक बसमध्ये गाइडची व्यवस्था असून, प्रवाशांना स्थळांविषयी सविस्तर माहिती पुरवली जाते. त्यामुळे पर्यटनाचा अनुभव अधिक समृद्ध होतो.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी तिकीट दर प्रतिव्यक्ती ₹५०० निश्चित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ३३ प्रवाशांच्या ग्रुप बुकिंगवर ५ प्रवाशांना १००% सवलत मिळते, त्यामुळे मोठ्या कुटुंबांसाठी किंवा मित्रमंडळींसाठी ही सेवा अधिक फायदेशीर ठरू शकते.

बुकिंग कुठे करावे लागेल?

बुकिंग करण्यासाठी प्रवाशांना डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, भोसरी बसस्थानक, निगडी आणि मनपा भवन या ठिकाणी जाऊन बुकिंग करता येईल. बुकिंगची वेळ सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

बुकिंग केलेल्या प्रवाशांसाठी आणखी एक सुविधा म्हणजे, प्रवासाच्या दिवशी त्यांच्या राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अन्य पीएमपी बसेसवर मोफत प्रवासाची संधी मिळणार आहे.

ही सेवा खासकरून अशा प्रवाशांसाठी आहे, ज्यांना पुणे शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळे फिरायची आहेत, पण स्वतःच्या वाहनाने प्रवास करणे शक्य नाही किंवा स्थानिक वाहतुकीची अचूक माहिती नाही. पीएमपीच्या या सेवेमुळे पर्यटन अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि आनंददायक होईल. त्यामुळे पुणे आणि परिसरातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पाहण्याची संधी दवडू नका आणि लवकरच आपल्या परिवारासह किंवा मित्रांसह पीएमपी पर्यटन बससेवेतून एक अविस्मरणीय सफर करा.

Leave a Reply