हनुमानजयंती वर्षातून दोनदा साजरी का करतात?, कारण ऐकून थक्क व्हाल!
Hanuman Jayanti | हनुमान जयंती ही भारतातील भक्तांसाठी एक अतिशय पवित्र आणि महत्त्वपूर्ण सण मानला जातो. दरवर्षी ही जयंती दोनदा साजरी केली जाते आणि 2025 मध्येही याला अपवाद नाही. या वर्षी चैत्र पौर्णिमा 12 एप्रिल रोजी असून, या दिवशी पहिली हनुमान जयंती साजरी होईल. तर दुसरी हनुमान जयंती कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला, म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल.
हनुमान जयंती दोनदा का साजरी केली जाते, हे अनेकांना आश्चर्य वाटू शकते. पण यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे, जी उत्तर आणि दक्षिण भारतात वेगवेगळी मानली जाते. दक्षिण भारतात चैत्र पौर्णिमेला हनुमानजींच्या दुसऱ्या जीवनाच्या स्मरणार्थ ही जयंती साजरी केली जाते, तर उत्तर भारतात त्यांचा जन्मोत्सव कार्तिक महिन्यात मानला जातो.
पौराणिक कथा-
वाल्मिकी रामायणात असा उल्लेख आहे की हनुमानजींचा जन्म कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला झाला. पण एक पुराणकथा अशीही आहे की, हनुमानजींनी सूर्याला फळ समजून गिळण्याचा प्रयत्न केला आणि इंद्राच्या वज्राने त्यांना गंभीर दुखापत झाली.
त्यानंतर वायुदेव रागावले आणि संपूर्ण विश्वात वारा बंद झाला. यामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली. तेव्हा देवतांनी ब्रह्मदेवाकडे विनंती केली आणि ब्रह्मदेवांनी हनुमानजींना पुन्हा जीवन दिलं. देवांनी त्यांना वेगवेगळ्या शक्तीही दिल्या. हाच दिवस चैत्र पौर्णिमा होता, त्यामुळे या दिवशीही जयंती साजरी केली जाते.
उत्तर भारतातील कथा-
उत्तर भारतात कार्तिक कृष्ण चतुर्दशीला हनुमान जन्मोत्सव मानला जातो. रामायणानुसार, माता सीता आणि श्रीराम यांनी हनुमानजींना अमरत्वाचा आशीर्वाद दिला होता. म्हणूनही हा दिवस पवित्र मानला जातो.
अशा प्रकारे, वर्षातून दोनदा साजरी होणारी हनुमान जयंती ही भक्तांच्या श्रद्धेचं आणि विविध प्रादेशिक परंपरांचं प्रतीक आहे.
