कोटींचं उत्पन्न, तरीही नाही टॅक्स! भारतातील ‘हे’ एकमेव राज्य आहे पूर्णपणे करमुक्त – जाणून घ्या कारणं?
Tax-Free State
Tax-Free State : संपूर्ण भारतात नागरिकांना त्यांच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागतो. सरकारकडून वर्षानुवर्षे करसंकलनाच्या विविध पद्धती राबविल्या जातात. परंतु, देशात एक असं राज्य आहे जिथे कोट्यवधींची कमाई करणाऱ्या नागरिकांनाही एक रुपयाही टॅक्स भरावा लागत नाही! ही बाब अनेकांना आश्चर्यचकित करणारी असली, तरीही ती कायद्याने मान्य आहे. हे राज्य म्हणजे सिक्कीम.
सिक्कीम हे भारतातील एकमेव टॅक्स-फ्री राज्य म्हणून ओळखले जाते. येथे स्थानिक नागरिकांना त्यांच्या उत्पन्नावर कोणताही आयकर भरावा लागत नाही. तुम्ही करोडपती असाल किंवा मध्यमवर्गीय – जर तुम्ही सिक्कीमचे मूळ रहिवासी असाल, तर तुमचं उत्पन्न कितीही असलं तरीही सरकार तुमच्याकडून आयकर वसूल करत नाही.
ही सवलत मिळण्यामागे भारतीय संविधानातील कलम 371F आणि आयकर कायद्यातील कलम 10 (26AAA) हे दोन महत्त्वाचे कायदे कारणीभूत आहेत. 1975 साली सिक्कीम भारतात विलीन झालं, त्यावेळी स्थानिकांना दिलेल्या आश्वासनांमध्येच त्यांची करमुक्त व्यवस्था कायम ठेवण्याचा निर्णय घेतला गेला होता. त्यामुळेच आजही सिक्कीमचे स्थानिक नागरिक ‘टॅक्स फ्री’ आहेत.
मात्र ही सवलत फक्त 1975 पूर्वीपासून सिक्कीममध्ये राहत असलेल्या मूळ रहिवाशांनाच लागू आहे. त्या वर्षानंतर इतर राज्यांतून जाऊन सिक्कीममध्ये स्थायिक झालेल्या लोकांना ही सवलत मिळत नाही – त्यांना आयकर भरावा लागतो.
सिक्कीममधील ही कर सूट केवळ स्थानिक संस्कृतीचे रक्षण करण्यासाठीच नाही, तर त्या राज्याच्या सामाजिक-सांस्कृतिक ओळखीला कायम ठेवण्यासाठीही आहे. सरकारने दिलेला हा विशेष दर्जा म्हणजे त्या भागातील लोकांना त्यांच्या पारंपरिक व्यवस्थेशी एकरूप राहता यावं, यासाठीचा एक प्रयत्न आहे.
फक्त सिक्कीमच नाही, तर ईशान्य भारतातील काही राज्यांतील अनुसूचित जमातींनाही आयकरातून सूट देण्यात आली आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, अरुणाचल प्रदेशसारख्या राज्यांमधील ठराविक आदिवासी समुदाय यामध्ये येतात. तसेच लडाख आणि जम्मू-काश्मीरच्या काही भागांतही विशिष्ट जमातींना कर सवलती देण्यात आल्या आहेत.
पण सिक्कीम हे एकमेव संपूर्ण राज्य आहे जिथे मूळ नागरिकांना त्याच्या उत्पन्नावर कोणताही आयकर भरावा लागत नाही. त्यामुळे देशातील इतर नागरिक जेव्हा ITR भरतात, रिटर्न फाईल करतात, त्यावेळी सिक्कीमचे रहिवासी मात्र त्या झंझटांपासून मुक्त असतात.
