October 31, 2026

कात्रज–कोंढवा मार्गावर अवजड वाहनांना नो एन्ट्री; ‘या’ कारणामुळे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

0
Katraj-Kondhwa Heavy Vehicle Ban

Katraj-Kondhwa Heavy Vehicle Ban

Katraj-Kondhwa Heavy Vehicle Ban : गंगाधाम चौक परिसरात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अखेर वाहतूक शाखेने कठोर पाऊल उचललं आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर शत्रुंजय मंदिर (कान्हा हॉटेल) ते गंगाधाम चौक आणि टिळेकर चौक ते गंगाधाम चौक या दोन्ही मार्गांवर आता ट्रक, डंपर, कंटेनर, मिक्सर अशा सर्व अवजड वाहनांना २४ तासांसाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश १ जुलैपासून तात्काळ लागू करण्यात आला असून, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला गेला आहे.

हे पण वाचा : पुण्यात पुन्हा सोन्याचे दर गगनाला भिडले, चांदीही शंभरीपार; एका क्लिकवर वाचा आजचे ताजे दर

गेल्या काही महिन्यांत या परिसरात अपघातांचं प्रमाण लक्षणीय वाढलं होतं. विशेषतः उतार असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यावरून भरधाव वेगात उतरणाऱ्या ट्रक आणि डंपरमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यातीलच एक हृदयद्रावक घटना ११ जून रोजी घडली. गंगाधाम चौकात भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील दीपाली सोनी (वय २८) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसर हादरला. स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली होती.

स्थानिकांचे म्हणणं होतं की गंगाधाम चौक हा मार्केट यार्डशी जोडलेला आणि अत्यंत वर्दळीचा भाग आहे. सकाळी आणि संध्याकाळी येथे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, आणि सामान्य नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. अशा वेळी अवजड वाहनांचा भरधाव वेग आणि रस्त्यांची अपुरी रुंदी ही गंभीर समस्या बनली होती. नागरिकांच्या या तक्रारींवर लक्ष देत वाहतूक शाखेने अखेर कडक निर्णय घेतला आहे.

या आदेशानुसार लुल्लानगर कोंढवा चौक, चंद्रलोक हॉस्पिटल चौक, वखार महामंडळ चौक आणि सेव्हन लव्ह्ज चौक या मार्गांवर सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत जड वाहनांना नो एन्ट्री लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गांवर आता नागरिकांना सुरक्षिततेची थोडीशी श्वास घेण्याची संधी मिळणार आहे.

हे पण वाचा : पुण्यातील सातबारा उताऱ्यांची मोठी चौकशी सुरू! तहसीलदार-प्रांताधिकारी अडचणीत? ५ वर्षांच्या नोंदींची तपासणी

वाहतूक शाखेने जड वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलं असून, नियम तोडणाऱ्यांविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. “अनेक वेळा रस्त्यावरून चालतानाही भीती वाटायची. मुलांना शाळेत सोडायला जाताना डंपर बाजूने निघाला की काळजाचा ठोका चुकायचा,” असं भावना सोसायटीमधील रहिवासी भारती पाटील सांगतात.

Leave a Reply