पुण्यातील मेट्रो स्टेशनवरून धावणार ई-पिंक रिक्षा! २८०० महिलांना मिळणार रोजगाराचं नवं साधन
E-pink Rickshaw Pune
E-pink Rickshaw Pune : पुणे शहरातील मेट्रोचा प्रवास अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी आता ‘तिचे’ बळ लाभणार आहे. मेट्रो स्थानकांपासून शेवटच्या टप्प्याच्या प्रवासासाठी — म्हणजे फीडर सेवेच्या सुलभतेसाठी — आता महिलांच्या चालवलेल्या ई-पिंक रिक्षांचा वापर होणार आहे. एकीकडे शहरातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असून, दुसरीकडे प्रवाशांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि विश्वासार्ह फीडर सेवा मिळणार आहे.
महामेट्रोच्या प्रवाशांना आतापर्यंतचा सर्वात मोठा त्रास म्हणजे मेट्रो स्थानकांपासून कार्यालय, बाजार, घर याठिकाणी जाण्यासाठीची वाहतूक. हीच गरज लक्षात घेऊन, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) आणि महिला व बालविकास विभागाच्या संयुक्त पुढाकाराने एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एकूण ३४०० महिलांना ई-पिंक रिक्षा देण्यात येणार असून, यातील २८०० रिक्षा केवळ पुणे शहरासाठी आरक्षित आहेत.
ही रिक्षा खरेदी करण्यासाठी महिलांना ९० टक्के अर्थसहाय्य मिळणार आहे. त्यात ७० टक्के रक्कम राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज स्वरूपात, तर २० टक्के रक्कम राज्य सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे. उर्वरित १० टक्के रक्कम लाभार्थीने भरायची आहे. गरजू आणि इच्छुक महिलांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक निवड समिती गठित करण्यात आली असून, सध्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पाच महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांवरून या ई-पिंक रिक्षा धावणार आहेत. यशस्वी प्रतिक्षेपानंतर इतर मेट्रो स्थानकांवरही ही सेवा वाढवली जाईल, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक (जनसंपर्क) हेमंत सोनवणे यांनी दिली.
या रिक्षांसाठीचे मार्ग निश्चित करण्याचे काम प्रादेशिक परिवहन विभागाने सुरू केले असून, प्रवाशांसाठी शेअर रिक्षाच्या तिकीट दरांबाबत आरटीएच्या नियमानुसार निर्णय घेतला जाणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले.
