October 30, 2026

रिलायन्सचा इतिहासातला सर्वात मोठा नफा, तरी शेअर्स पडले? वाचा नेमकं कारण काय?

0
Reliance Q1 Results 2025

Reliance Q1 Results 2025

Reliance Q1 Results 2025 : देशातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील कंपनींपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२५ च्या पहिल्या तिमाहीत विक्रमी नफा कमावला असतानाही, कंपनीचे शेअर्स सोमवारी जवळपास २.७ टक्क्यांनी घसरले. हे पाहून अनेक गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ चक्रावले. पण हा विरोधाभास काही आकडेवारी आणि गुंतवणुकीच्या बारकाव्यांत लपलेला आहे.

हे पण वाचा : ५७० रुपयांचा शेअर थेट ७४० वर! Anthem IPO ने दिला मोठा रिटर्न

रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी जाहीर केलेल्या निकालात कंपनीने ३०,७८३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याचे सांगितले. ही रक्कम रिलायन्सच्या इतिहासातील सर्वात मोठा तिमाही नफा ठरतो. परंतु त्यातला एक मोठा हिस्सा – सुमारे ८,९२४ कोटी रुपये – एशियन पेंट्समधील कंपनीचा हिस्सा विकून मिळवलेला आहे. म्हणजेच, हा नफा मुख्य व्यवसायातून आलेला नसून एकवेळच्या आर्थिक व्यवहारातून मिळवलेला आहे.

बाजार नेहमी कंपन्याच्या मुख्य व्यवसायातील कामगिरीवर विश्वास ठेवतो. त्यामुळे नियमित उत्पन्नात घट दिसल्यास नफ्याचे आकडे कितीही मोठे असले तरी गुंतवणूकदार सावध राहतात. याच कारणामुळे, रिलायन्सच्या मुख्य व्यवसायातील म्हणजेच किरकोळ विभाग (रिटेल) आणि पारंपरिक तेल-रसायन (O2C) विभागातील कामगिरी गुंतवणूकदारांच्या अपेक्षांवर खरी उतरली नाही.

रिलायन्स रिटेल विभागाची कमाई अपेक्षेपेक्षा कमी ठरली. गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त ८ टक्क्यांची वाढ झाली आणि EBITDA देखील मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांच्या अंदाजापेक्षा कमी होता. त्याला कारणीभूत ठरली मान्सूनची लवकर सुरुवात, ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेससारख्या विभागात विक्री कमी झाली. त्याचवेळी नवीन स्टोअर्स उघडण्याचे नियोजनही रखडले.

हे पण वाचा : बँकिंग शेअरमध्ये जोरदार तेजी! HDFC बँकेने दिल्या गुंतवणूकदारांना ३ सुखद बातम्या

तेल आणि रसायन विभागाची कामगिरीही फारशी समाधानकारक नव्हती. काही रिफायनरी युनिट्समध्ये नियोजित देखभालीमुळे उत्पादनात अडथळा निर्माण झाला. परिणामी, त्या विभागाचे उत्पन्न आणि EBITDA दोन्ही ब्रोकरेज संस्थांच्या अंदाजांपेक्षा ५ ते ८ टक्क्यांनी कमी राहिले.

या सगळ्याचा परिणाम म्हणून सोमवारी बाजारात रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण झाली. एखाद्या कंपनीचा नफा विक्रमी असला, तरीही गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवण्यासाठी त्या नफ्याचा स्रोत आणि व्यवसायाची टिकाऊ क्षमता महत्त्वाची ठरते.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही घसरण तात्पुरती असून कंपनीच्या मूलभूत गोष्टी अद्यापही मजबूत आहेत. डिजिटल, टेलिकॉम आणि नवीन ऊर्जा क्षेत्रांमध्ये रिलायन्सने सुरु केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम भविष्यात नक्कीच सकारात्मक दिसून येईल.

 

Leave a Reply