शेअर बाजारात जोरदार ओपनिंग! सेन्सेक्स 257 अंकांनी वधारला, फार्मा-IT मध्ये तेजी
Stock Market Opening
Stock Market Opening : भारतीय शेअर बाजाराने आज बुधवारी जोरदार उसळी घेतली आहे. सकाळीच बाजार खुला होताच सेन्सेक्स २५७ अंकांनी वधारून ८१,५९४ च्या पातळीवर पोहोचला. निफ्टीनेही ६९ अंकांची उडी घेत २४,८९० चा टप्पा गाठला. बँक निफ्टी ८८ अंकांनी वाढून ५६,३१० वर स्थिरावला.
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचा कल आयटी, फार्मा, मेटल, मीडिया आणि पीएसयू बँक शेअर्सकडे अधिक होता. या क्षेत्रांमध्ये खरेदीचा ओघ वाढलेला दिसून आला. याउलट ऑटो, एफएमसीजी आणि खासगी बँक शेअर्समध्ये काहीशी नफेखोरी झाल्याने विक्रीचा दबाव जाणवला.
सकाळच्या व्यवहारात लार्सन अँड टुब्रो (LT), भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), एनटीपीसी, सन फार्मा आणि बजाज फायनान्स हे शेअर्स टॉप गेनर्स ठरले. दुसरीकडे, ICICI बँक, एशियन पेंट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा मोटर्स आणि Eternal या कंपन्यांचे शेअर्स घसरले.
बाजारातील या तेजीत देशांतर्गत आणि जागतिक घडामोडींचा मोठा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज ६.२ टक्क्यांवरून वाढवून ६.४ टक्क्यांपर्यंत नेल्याने गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. यामुळे भारताची अर्थव्यवस्था मजबूत दिशेने वाटचाल करत असल्याचा संकेत मिळतो. दुसरीकडे, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २० ते २५ टक्के टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे व्यापार क्षेत्रात थोडीशी चिंता निर्माण झाली असली तरी त्याचा बाजारावर फारसा परिणाम दिसून आलेला नाही.
अमेरिकन शेअर बाजारात काल डाऊ जोन्समध्ये २०० अंकांची घसरण झाली. मात्र S&P 500 आणि नॅस्डॅकने इंट्राडेमध्ये नवीन उच्चांक गाठला. आज रात्री फेडरल रिझर्व्हची व्याजदर बैठकीची घोषणा होणार असल्याने जागतिक बाजारातही उत्सुकतेचे वातावरण आहे. आशियाई बाजारांत मात्र संमिश्र चित्र होते. जपानचा निक्केई निर्देशांक खाली आला, तर GIFT निफ्टी थोड्याशा घसरणीसह व्यवहार करत होता.
कमोडिटी बाजारातही हालचाल वाढली आहे. अमेरिकेने रशियावर केलेल्या वक्तव्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी आली असून ब्रेंट क्रूड ३ टक्क्यांनी वाढून ७२ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. सोनं ४५० रुपयांनी वाढून ९८,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर गेले, तर चांदी ७५० रुपयांनी वधारून १,१३,८०० रुपये किलो झाली.
विदेशी गुंतवणूकदारांनी सलग सातव्या दिवशी विक्री केली असून काल त्यांनी कॅश सेगमेंटमध्ये ४,६०० कोटी रुपयांची विक्री केली. मात्र, देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी ६,१०० कोटी रुपयांची जोरदार खरेदी करत बाजाराला बळ दिले आहे.
