होम लोन घेता? ‘या’ चुका टाळा, नाहीतर लाखोंचं नुकसान होईल! वाचा सविस्तर
Home Loan
Home Loan : घर खरेदी करणं ही आयुष्यातली एक महत्त्वाची आणि आनंददायी घटना असते. मात्र त्यासाठी घेतलेल्या कर्जामुळे भविष्यात आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात, हे अनेकांना उशिरा लक्षात येतं. होम लोन घेताना आपण फक्त मासिक हप्त्यावर (EMI) लक्ष केंद्रित करतो, पण त्यामागचं व्याजदराचं गणित आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम विचारात घेत नाही. त्यामुळे अनेक वेळा २० वर्षांच्या कालावधीचं कर्ज फेडायला तब्बल ३० ते ३३ वर्षं लागतात, आणि त्यात लाखो रुपयांचं व्याज अधिक भरावं लागतं.
हे पण वाचा : रिलायन्स शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, आता BUY करावे का? जाणून घ्या कारणं
लोन घेताना किंवा दरम्यानच्या काळात बँकेकडून व्याजदरात वाढ केली गेली, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या कर्जाच्या कालावधीवर होतो. सुरुवातीला जो EMI ठरवलेला असतो, तो कायम ठेवण्यात अनेकांना गोड वाटतं, कारण मासिक हप्ता न वाढल्याने त्यांची आर्थिक जबाबदारी वाढत नाही. पण हीच चूक पुढे मोठ्या आर्थिक नुकसानात बदलते. EMI तोच ठेवला, तर बँका कर्जाचा कालावधी वाढवतात. त्यामुळे व्याजाच्या स्वरूपात अधिक रक्कम भरावी लागते.
उदाहरणार्थ, एखाद्याने जर ३० लाखांचं कर्ज ८ टक्के दराने २० वर्षांसाठी घेतलं असेल, तर मासिक EMI सुमारे २५ हजार रुपयांपर्यंत ठरतो. पण पाच वर्षांनंतर जर व्याजदर वाढून ११ टक्के झाला, आणि तरीही आपण EMI तसाच ठेवला, तर उरलेली थकबाकी फेडायला १५ वर्षांऐवजी २८ वर्षं लागतात. म्हणजे एकूण कालावधी ३३ वर्षांवर जातो. इतकंच नव्हे, तर या वाढलेल्या कालावधीत तुम्हाला काही लाखांचं अतिरिक्त व्याज भरावं लागतं, जे सहज वाचू शकलं असतं.
यातून बाहेर पडण्यासाठी योग्य वेळी निर्णय घेणं गरजेचं आहे. व्याजदर वाढल्यावर शक्य असेल तर EMI वाढवण्याचा निर्णय घ्या. हप्ता थोडा जरी वाढवला तरी कालावधी वाढणार नाही आणि एकूण व्याज कमी होईल. अनेकदा ग्राहक स्वतःहून बँकेशी संपर्क करत नाहीत, म्हणून बँका आपोआप कालावधी वाढवतात. त्यामुळे ग्राहकांनीच पुढाकार घ्यावा.
हे पण वाचा : FD पेक्षा भरघोस! SBI बँकेचा शेअर देणार 24.54% रिटर्न, गुंतवणूकदारांना संधी
प्रत्येक सहा महिन्यांनी आपल्या लोनचं स्टेटमेंट तपासणं, आणि आवश्यक वाटल्यास ‘लोन पुनर्रचना’ (Loan Restructuring) करून घेणं हाही एक चांगला पर्याय ठरू शकतो. ‘कमी EMI म्हणजे फायदेशीर’ हा गैरसमज दूर करा. कारण दीर्घकाळ चालणारा कर्जाचा ओझा हे कोणत्याही घरगुती बजेटसाठी त्रासदायक ठरू शकतं.
