टॅनिंगने चेहरा निस्तेज झालाय ? मग घरबसल्या ‘हा’ उपाय वापरुन पाहा! चेहरा होईल पुन्हा चमकदार
उन्हाळ्यात सकाळी घरातून बाहेर पडण्याचं नाव घेतलं तरी चेहऱ्यावरची काळजी डोळ्यांसमोर येते. सततच्या उन्हाच्या संपर्कामुळे त्वचेला टॅनिंग होण्याचा धोका वाढतो. अशा वेळी आपण कितीही महागडी क्रीम्स आणि सनस्क्रीन वापरल्या, तरीही कधी-कधी त्यांचा परिणाम फारसा दिसून येत नाही.
पण अलीकडेच प्रसिद्ध हेअर आणि स्किन तज्ज्ञ जावेद हबीब यांनी सोशल मीडियावर एक असा घरगुती उपाय शेअर केला आहे, जो अगदी स्वस्त, सोपा आणि कोणत्याही साइड इफेक्टशिवाय त्वचेला चमक देऊ शकतो.
जावेद हबीब यांचा अनुभव आणि त्यांचा साधेपणा यामुळे त्यांच्या टिप्स नेहमीच प्रभावी वाटतात. त्यांच्या मते, टॅनिंगचा प्रश्न आपण आपल्या घरात असणाऱ्या दोन गोष्टींनी सहज सोडवू शकतो. त्यांनी सांगितले की, कॉफी पावडरमध्ये जर तुम्ही मध मिसळलात आणि ती पेस्ट चेहऱ्यावर लावली, तर ही साधी कृती तुमच्या त्वचेसाठी जणू वरदान ठरू शकते.
कॉफी आणि मध-
कॉफी आणि मध त्वचेसाठी एक नैसर्गिक स्क्रब आणि टोनरसारखे काम करते. कॉफीमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात आणि डेड स्किन हटवून चेहरा उजळवतात. दुसरीकडे, मध त्वचेला ओलावा देऊन ती मऊ आणि चमकदार बनवतो. ही पेस्ट बनवण्यासाठी एका वाटीत थोडी कॉफी पावडर घ्या, त्यात एक चमचा शुद्ध मध मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. सुमारे 5 मिनिटे ठेवून हलक्या हाताने मालिश करत चेहरा धुवा. नियमित वापराने टॅनिंग हळूहळू कमी होऊ लागते.
जावेद हबीब यांच्या या उपायाबरोबरच पारंपरिक घरगुती उपाय सुद्धा उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ, बेसन, दही आणि थोडी हळद मिसळून बनवलेला फेसपॅकसुद्धा त्वचेला उजळवण्याचे काम करतो. हा पॅक चेहऱ्यावर लावून काही वेळ ठेवा आणि नंतर हलक्या हाताने चोळून धुवा. यामुळे त्वचेला नैसर्गिक तेज येते आणि टॅनिंगचा परिणाम कमी होतो.
