Mahindra XUV700 फेसलिफ्ट येतेय नवीन अवतारात! टेस्टिंग दरम्यान दिसला फर्स्ट लुक, पाहा लाँचिंग टाइमलाइन आणि किंमत
महिंद्रा अँड महिंद्रा ही भारतातील अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी SUV सेगमेंटमध्ये आपली मजबूत पकड कायम ठेवत आहे. कंपनीची प्रीमियम SUV XUV700 सध्या भारतीय ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. आता या SUV चे फेसलिफ्ट मॉडेल लवकरच बाजारात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. अलीकडेच या गाडीचे टेस्टिंग सुरू असल्याचे स्पष्ट झाले असून पहिल्यांदाच ही SUV चाचणी दरम्यान पाहण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा XUV700 फेसलिफ्ट हे मॉडेल पूर्णपणे झाकून ठेवण्यात आले होते. त्यामुळे गाडीचे संपूर्ण डिझाइन अद्याप स्पष्ट नाही. मात्र, यामध्ये गोलाकार हेडलाइट्स दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्या Mahindra Thar Roxx सारख्या डिझाइनसारख्या असतील. या नवीन डिझाइनमध्ये नवीन फ्रंट ग्रिल देखील समाविष्ट असू शकतो. सध्या उपलब्ध माहितीनुसार, इतर कोणतेही बदल स्पष्टपणे आढळलेले नाहीत.
इंजिन अपडेट-
महिंद्राकडून या फेसलिफ्टमधील इंजिन कॉन्फिगरेशनमध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी शक्यता आहे. यामध्ये आज उपलब्ध असलेले पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायच कायम राहतील. त्यामुळे परफॉर्मन्सच्या दृष्टीने मोठा फरक जाणवण्याची शक्यता नाही, पण तांत्रिकदृष्ट्या काही सुधारणा होऊ शकतात.
महिंद्रा अलीकडे त्यांच्या SUV मालिकेतील गाड्यांची नावे बदलत आहे. Mahindra XUV300 हे मॉडेल XUV 3XO या नावाने सादर करण्यात आले होते. त्यामुळे XUV700 चे नाव देखील बदलून XUV 7X0 असे ठेवले जाऊ शकते, अशी शक्यता वाहन तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. नावात बदल केल्याने या गाडीची नवीन ओळख तयार होईल आणि नव्या ग्राहकांना आकर्षित करता येईल.
लाँचिंग कधी?
लाँचिंगच्या बाबतीत महिंद्राकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु टेस्टिंगची प्रक्रिया पाहता, ही SUV वर्षाच्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीस लाँच केली जाऊ शकते. ग्राहकांमध्ये या फेसलिफ्टबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
महिंद्रा XUV700 चे हे नविन रूप बाजारात आल्यावर ती सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक स्टायलिश आणि फीचर-समृद्ध असेल, अशी अपेक्षा आहे. महिंद्राच्या या पावलामुळे प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.
