वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आता कधी?, भारतात सूतक काळ लागणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
सप्टेंबर महिना हा धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरणार आहे. यावर्षीच्या दुसऱ्या चंद्रग्रहणाचा अनुभव 7 सप्टेंबर 2025 रोजी संपूर्ण भारतात घेता येणार आहे. चंद्रग्रहण हा केवळ खगोलीय घटक नसून, त्याचं धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्वही प्राचीन काळापासून मान्य आहे. विशेषतः पौर्णिमेच्या रात्री होणाऱ्या या पूर्ण चंद्रग्रहणामध्ये ‘ब्लड मून’चं अत्यंत दुर्मीळ आणि गूढ दृश्य दिसणार आहे.
7 सप्टेंबररोजी दिसणार चंद्रग्रहण
7 सप्टेंबर रोजी भाद्रपद महिन्याची पौर्णिमा आहे. या दिवशी रात्री 9:58 वाजता चंद्रग्रहण सुरू होणार असून, ते 1:26 वाजेपर्यंत चालेल. म्हणजेच चंद्र जवळपास 3 तास 28 मिनिटं पृथ्वीच्या सावलीत राहणार आहे. हे एक ‘पूर्ण चंद्रग्रहण’ असणार आहे, ज्यामध्ये चंद्र पूर्णतः झाकला जाणार आहे आणि त्याला लालसर छटा येऊन ‘ब्लड मून’चे सुंदर दृश्य पाहायला मिळेल.
काय करू नये?
हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार असल्याने धार्मिक दृष्टिकोनातून त्याचा ‘सुतक काळ’ लागू होणार आहे. चंद्रग्रहणापूर्वी 9 तासांपासून सुतक कालमान सुरू मानलं जातं. यावेळी मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात, देवपूजेपासून ते धार्मिक विधींपर्यंत सर्व काही थांबवावं लागतं. जेवण बनवणं, खाणं-पिणं यावर देखील मर्यादा असतात. अन्न पदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकून ते सुरक्षित ठेवण्याची परंपरा आहे.
या दिवशी काय करावे?
सुतक काळामध्ये अध्यात्मिक आणि मानसिक शांती राखण्याचा सल्ला दिला जातो. ध्यानधारणा, मंत्रजप आणि मौन धारण यांसारख्या कृती केल्यास चांगला परिणाम होतो, असं मानलं जातं. विशेषतः गर्भवती महिलांसाठी सुतक काळ अधिक संवेदनशील असतो, त्यामुळे या काळात त्यांना विशेष काळजी घेण्याचं सुचवलं जातं.
चंद्रग्रहणाचं हे दृश्य निसर्गाच्या अद्भुततेचा भाग आहे. काहींसाठी ते वैज्ञानिक कुतूहलाचं कारण असतं, तर काहींसाठी अध्यात्मिक अनुभूतीचा क्षण. पण एक गोष्ट नक्की, आकाशात झळकणारा ‘ब्लड मून’ हा अनुभव प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरणार आहे.
