मँगो शेक आवडीने पिताय, पण त्यातील कॅलरीजचं प्रमाण माहितेय का?; डाएट चालू असेल तर नक्की वाचा!
तीव्र उन्हाळ्यातही एक आनंद देणारी गोष्ट म्हणजे आंब्याचा गोडवा. उन्हाळ्यात आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ, शेक बनवले जातात. त्यात मँगो शेक तर हमखास बनवला जातो. घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा शेक खूप आवडतो.
पण जसं शरीराच्या आरोग्याचं भान येतं, तसे काही प्रश्न मनात उभे राहतात. मँगो शेक प्यायल्याने वजन वाढतं का? त्यात किती कॅलरीज असतात? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तो खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
भारतात विविध प्रकारचे आंबे मिळतात हापूस, लंगडा, चौसा, अल्फान्सो, केशर… आणि प्रत्येक आंब्याची चव अनोखी असते. आंब्याचं आकर्षण इतकं जबरदस्त असतं की अनेकजण दरवर्षी या सीझनची वाट पाहतात. आंब्याच्या या प्रेमातच मग मँगो शेक हा एक खास प्रकार तयार होतो. पण गंमत अशी की, मँगो शेक जसा गोड असतो तसा कॅलरीजने भरलेलाही असतो.
मँगो शेक चांगला की घातक?
अनेकदा शेक करताना आपण त्यात फुल क्रीम दूध, साखर आणि काही वेळा आईस्क्रीमही टाकतो. त्यामुळे त्याची चव तर भारी होते, पण कॅलरीजचे प्रमाणही बऱ्यापैकी वाढते. तज्ज्ञ सांगतात की, अशा प्रकारे बनवलेल्या एका ग्लास मँगो शेकमध्ये जवळपास 200 ते 300 कॅलरीज असू शकतात. आणि जर तुम्ही वजन कमी करण्याचा आटापिटा करत असाल, तर हे प्रमाण तुमच्यासाठी फारसं हिताचं ठरणार नाही.
मुळात आंबा हा स्वतःच साखरेचा नैसर्गिक स्रोत आहे. त्यात व्हिटॅमिन A, C, K, B6, फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स हे घटक असतात, जे आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानले जातात. पण जेव्हा त्यात साखर आणि फुल क्रीम दूध मिसळलं जातं, तेव्हा तो एक हेल्दी पर्याय न राहता वजन वाढवणारा पदार्थ बनतो.
मँगो शेक कुणासाठी घातक?
मधुमेह असलेल्या लोकांसाठी तर मँगो शेक एक धोका ठरू शकतो. रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्याने वाढवणारा हा शेक शक्यतो टाळलेलाच बरा. डॉक्टरही अशा परिस्थितीत फक्त फळ खाण्याचा सल्ला देतात, फळांचं गोड पेय नव्हे.
