पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मोठा प्लॅन; ‘ही’ खास सुविधा सुरु होणार
Pimpri Chinchwad Smart Parking
Pimpri Chinchwad Smart Parking : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यातून निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत होता. मात्र या समस्येवर मात करण्यासाठी महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, शहरातील १० ठिकाणी ‘स्मार्ट पे अँड पार्क’ योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.
गर्दीच्या भागात वाहन उभे करण्यासाठी जागा शोधणे म्हणजे वाहनचालकांसाठी दिव्यच काम. त्यातून वाहतुकीचा खोळंबा, अपघाताची शक्यता, वेळेचा अपव्यय – ही रोजचीच गोष्ट झाली होती. हे लक्षात घेऊन ‘पार्किंग पाल’ या स्टार्टअपच्या सहकार्याने महापालिकेने शहरातील १० प्रमुख ठिकाणी स्मार्ट पार्किंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या पार्किंगसाठी मोबदला आकारला जाणार असला, तरी सुरक्षित आणि निश्चित पार्किंगची हमी या सुविधेमुळे मिळणार आहे.
चिंचवडमधील चापेकर चौक, निगडीतील रामकृष्ण मोरे नाट्यगृह, भक्ती-शक्ती उड्डाणपूल, स्पॉट-१८ मॉल, नाशिक फाटा, मदर तेरेसा एम्पायर इस्टेट पुलाखालची जागा अशा १० ठिकाणी ही यंत्रणा लागू करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी वाहनधारकांना ऑनलाइन किंवा व्हॉट्सॲपद्वारे पार्किंगची माहिती मिळणार असून, जागा आरक्षित करता येणार आहे. त्यामुळे सध्या वाहनचालकांना भेडसावणारी जागा न मिळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या आसपास पोहोचली असून, गेल्या तीन वर्षांतच तब्बल साडेतीन लाख नवीन वाहने नोंदणीत आली आहेत. ही वाढ चिंतेची बाब असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतुकीची गती सुरळीत ठेवण्यासाठी अशा योजनांची अंमलबजावणी अत्यावश्यक बनली आहे.
ई-गव्हर्नन्स अंतर्गत महत्त्वाची पावले
‘पे अँड पार्क’ योजना केवळ एक प्रायोगिक प्रयोग न राहता, आता ती शाश्वत स्वरूपात राबवली जाणार आहे. ही योजना मुख्यमंत्री १५० दिवस कार्यक्रमांतर्गत समाविष्ट करण्यात आली असून, शहरी वाहतुकीच्या सुस्थितीसाठी हे एक टप्पेवार महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
