पुणे शहर हादरलं! कर्तव्य बजावताना हृदयविकाराचा झटका; पुण्यात वाहतूक पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू
Pune Traffic Police Death
Pune Traffic Police Death : पुणे शहराच्या रस्त्यांवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रोज झगडणाऱ्या एका कर्तव्यदक्ष पोलिसाचा, ड्युटीवर असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कात्रज मंडई चौकात घडली. पुणे वाहतूक शाखेतील पोलिस नाईक धनाजी भरत वणवे (वय ४२) यांना बुधवारी सायंकाळी अचानक चक्कर आली आणि काही क्षणांतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पोलिस दलात आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
हे पण वाचा : काय सांगता? पुण्यात चक्क घरचं चोरीला गेलं; घटना ऐकून पोलिसही थक्क
नेहमीप्रमाणे आपली ड्युटी पार पाडत असताना वणवे अचानक कोसळले. घडले ते अगदी क्षणार्धात. सहकाऱ्यांनी धाव घेत त्यांना तात्काळ कात्रज येथील साईस्नेह रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यावर सर्वांनाच धक्का बसला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
धनाजी वणवे हे गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक शाखेत कार्यरत होते. त्यांची ओळख एका शांत, संयमी आणि मनमिळावू अधिकाऱ्याची होती. रस्त्यावरील प्रचंड तणाव, कडक उन्हाळा, पावसात भिजत केलेली ड्युटी आणि कायमचा नागरिकांच्या तक्रारींचा सामना करताना त्यांनी कधीही खचून न जाता, निःस्वार्थपणे आपलं कर्तव्य बजावलं. सहकाऱ्यांमध्ये ते “वणवे सर” म्हणून ओळखले जात आणि त्यांचं हसू, मनमोकळेपणा हे सगळ्यांनाच सवयीचं झालं होतं.
त्यांच्या अचानक जाण्यामुळे फक्त पोलिस दल नव्हे तर अनेक स्थानिक नागरिकांनाही धक्का बसला. कात्रज परिसरात दररोज शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था पाहणाऱ्या आणि ट्रॅफिकमधून गाड्यांना मार्गदर्शन करणाऱ्या या चेहऱ्याचा आज अचानक विरह झाल्याने अनेकांनी डोळे पुसले.
हे पण वाचा : नामांतरावरून राज्यात वाद वाढला! आता ‘पिंपरी-चिंचवड’चं नाव बदलण्याची जोरदार मागणी
वणवे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, शालेय वयातील मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. कुटुंबावर हा आघात अचानक आभाळ कोसळल्यासारखा झाला आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आणि कुटुंबाच्या आधाराची चिंता आता समोर उभी राहिली आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, वाहतूक विभागाचे उपायुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. “कर्तव्यावर असताना आपला जीव गमावणाऱ्या पोलिस नाईक वणवे यांचं बलिदान विसरणं अशक्य आहे,” अशा शब्दांत पोलिस दलाने त्यांना श्रद्धांजली वाहिली.
