पुणेकरांसाठी ब्रेकिंग न्यूज – तुमच्या भागात येणार नवं पोलीस ठाणं? वाचा महत्वाची माहिती
Pune New Police Stations
Pune New Police Stations : पुणे शहराच्या वेगाने विस्तारणाऱ्या हद्दीत आता कायदा व सुव्यवस्थेची घडी अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पुणे शहरात लोहगाव, नऱ्हे, मांजरी, लक्ष्मीनगर (येरवडा), आणि येवलेवाडी (उंड्री) या पाच ठिकाणी नवीन पोलीस ठाण्यांची स्थापना होणार आहे. या ठिकाणांची पोलीस ठाण्यांच्या दृष्टिकोनातून नव्याने हद्दी निश्चित करण्यात आल्या असून यासंबंधीचा प्रस्ताव राज्याच्या गृह विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
हे पण वाचा : ‘या’ पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त उसळी! टार्गेट प्राईस थेट ३० रुपयांच्या दिशेने
गेल्या काही वर्षांत पुण्याच्या शहरी विस्ताराने वेग घेतला आहे. विमानतळ, नऱ्हे, मांजरीसारख्या भागांमध्ये वस्ती वाढली असून वाहनांच्या संख्येपासून गुन्हेगारीच्या घटनांपर्यंत सर्वच गोष्टींचा भार शहराच्या पोलीस यंत्रणेवर वाढला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक पातळीवर पोलीस यंत्रणा मजबूत करणे अपरिहार्य झाले होते. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी यासंदर्भात माहिती देताना स्पष्ट केले की, “नवीन पोलीस ठाण्यांमुळे नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करता येईल आणि पोलिसांची गस्त, तपास प्रक्रिया अधिक परिणामकारक होईल.”
याशिवाय, पुणे पोलीस दलात सात पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नव्या पदांची निर्मितीही प्रस्तावित आहे. यामध्ये वाहतूक शाखेसाठी दोन, मुख्यालयासाठी दोन, सायबर गुन्हे शाखेसाठी दोन आणि विशेष शाखेसाठी एक उपायुक्त नेमण्याचा विचार आहे. या निर्णयामुळे पुण्यातील गुन्हे तपास आणि गस्त अधिक चोख होणार आहे.
सध्या पुणे पोलीस दलात पाच परिमंडळे आहेत. मात्र कामकाज गतिमान करण्यासाठी आणि तक्रारींचे सुटसुटीत निवारण करण्यासाठी ही संख्या सातवर नेण्याचा प्रस्तावही वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे. याचा सकारात्मक परिणाम पोलिसांच्या प्रशासकीय कामकाजावर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हे पण वाचा : १६ जुलै राशीभविष्य : ‘या’ राशींना मिळणार नशिबाची साथ आणि धनप्राप्तीचा योग!
नवीन पोलीस ठाण्यांबरोबरच शहरात ३० नवीन पोलीस चौक्याही प्रस्तावित आहेत. गंभीर घटना घडल्यास सर्वप्रथम नागरिक पोलीस चौकीत धाव घेतात. त्यामुळे नागरिकांच्या त्वरित मदतीसाठी आणि चौकशीसाठी चौक्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
या नव्या पोलीस ठाण्यांची निर्मिती खालीलप्रमाणे होणार आहे –
विमानतळ पोलीस ठाण्यातून लोहगाव पोलीस ठाणे
नांदेड सिटी ठाण्यातून नऱ्हे पोलीस ठाणे
हडपसर ठाण्यातून मांजरी पोलीस ठाणे
येरवडा ठाण्यातून लक्ष्मीनगर पोलीस ठाणे
कोंढवा ठाण्यातून येवलेवाडी पोलीस ठाणे
