पुण्यातील IT हबमध्ये अंधार! हिंजवडीतील MNC कंपन्या बंद, वाचा नेमकं कारण काय?
Pune Hinjewadi IT Park
Pune Hinjewadi IT Park : पुण्यातील हिंजवडी आयटी हबमध्ये रविवारी अचानक झालेल्या वीज बिघाडामुळे संपूर्ण भाग अंधारात गेला असून, भारतातील सर्वात मोठ्या आयटी पार्कपैकी एक असलेल्या या परिसरातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कामकाज ठप्प झाले आहे. सुमारे 12 हजार लघुदाब ग्राहक आणि 91 उच्चदाब ग्राहक यांना याचा मोठा फटका बसला आहे.
हे पण वाचा : भारताच्या टॉप 10 श्रीमंतांची यादी जाहीर! भारतात अंबानी नंबर 1, बाकी टॉप 10 कोण?
महापारेषण कंपनीच्या 220 केव्ही इन्फोसिस ते 220 केव्ही पेगासस या भूमिगत अतिउच्चदाब वीज वाहिनीत रविवारी दुपारी 2.10 वाजता तांत्रिक बिघाड झाला. विशेष म्हणजे, ही वाहिनी सकाळी नियोजित देखभाल आणि दुरुस्तीसाठी बंद करण्यात आली होती. मात्र, दुरुस्ती पूर्ण करून विजेचा पुरवठा पुन्हा सुरू करताना अचानक मोठा बिघाड झाला, आणि परिणामी संपूर्ण हिंजवडी परिसराचा वीजपुरवठा कोलमडला.
महावितरणने पर्यायी मार्गांद्वारे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरीही, कंपन्यांना लागणारी विजेची गरज पूर्ण होत नाही. महावितरणच्या माहितीनुसार, जवळपास 63 मेगावॅटहून अधिक वीज भार दुसऱ्या वाहिन्यांद्वारे वळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र तरीही वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू होण्यासाठी किमान 3 ते 4 दिवस लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हे पण वाचा : पुण्यात फिरायला जाण्याचा प्लॅन आहे? मग ‘या’ प्रसिद्ध ठिकाणांना चुकूनही विसरू नका!
या बिघाडाचा फटका केवळ आयटी कंपन्यांनाच नाही, तर एमआयडीसी, रायसोनी पार्क, डॉहलर कंपनी, विप्रो सर्कल परिसरातील सर्व व्यवसायिक व रहिवासी ग्राहकांना बसला आहे. अनेक कंपन्यांनी तातडीने वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे, तर काहींचे प्रकल्प व क्लायंट डेडलाईन्स धोक्यात आले आहेत.
या संपूर्ण घटनेमुळे आयटी सेक्टरवर मोठा आर्थिक व तांत्रिक ताण निर्माण झाला आहे. अनेक कंपन्यांच्या डेटा सेंटर्स, नेटवर्किंग यंत्रणा यावर थेट परिणाम झाला आहे. काही कंपन्यांना जनरेटर किंवा बॅकअप सोल्यूशन्सवर काम चालवावे लागत आहे, ज्याचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
