भंडाऱ्यामुळे सोन्याच्या जेजुरीला धोका, जेजुरीतील भंडाऱ्याबाबत धक्कादायक माहिती आली समोर!
पुणे: महाराष्ट्राच्या कुलदैवत खंडोबाची नगरी जेजुरी ‘सोन्याची जेजुरी’ म्हणून ओळखली जाते. भाविकांच्या भक्तीचा रंग म्हणून येथे मोठ्या प्रमाणावर पिवळ्या भंडाऱ्याची उधळण केली जाते.
मात्र, याच भंडाऱ्यातील भेसळीमुळे आता भाविक आणि स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच, जेजुरी गडाच्याही संरचनेवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या समस्येवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी जेजुरीतील मार्तंड देवसंस्थेचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली आहे. त्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांना निवेदन देऊन भेसळ रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
शिवराज झगडे यांनी सांगितले की, हळद आणि कुंकवाला भारतीय संस्कृतीत महत्त्व आहे. जेजुरीत पुरातन काळापासून भंडाऱ्याची उधळण हा धार्मिक विधींचा अविभाज्य भाग आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत या भंडाऱ्यात भेसळ होत असल्याचे आढळून आले आहे.
स्थानिक ग्रामस्थ, वारकरी आणि खांदेकरी वर्ग याबाबत प्रशासनाला वारंवार सूचना देत आहेत. परंतु, बाहेरून काही व्यापारी येथे टर्मरिक पावडर, यलो पावडर, आणि ‘नॉन-एडिबल’ (खाण्यायोग्य नसलेला) शिक्का असलेल्या पिशव्या विकत आहेत. यामुळे भाविकांना आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असून, स्थानिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे आणि भेसळयुक्त भंडाऱ्याच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी झगडे यांनी केली आहे. शुक्रवारी त्यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांची भेट घेतली असून, प्रशासनाने कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे.
भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्या या प्रकारावर लवकरच कठोर पावले उचलली जाणार का? प्रशासन याकडे कसा प्रतिसाद देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
