October 29, 2026

बोपदेव घाट असुरक्षित! पोलिसांच्या गस्तीतच धक्कादायक प्रकार आला उघडकीस

0
Punelive24 (6)

पुणे- पुण्याहून सासवडला जाणाऱ्या बोपदेव घाटात काही महिन्यांपूर्वीच एका महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती.

या घटनेनंतर घाट परिसरासह पुण्यातील इतर निर्जन ठिकाणी सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची चर्चा झाली. राज्य सरकारने यासाठी तब्बल 80 कोटींचा निधी जाहीर केला. मात्र, आजही बोपदेव घाटात ना पथदिवे बसवले गेले, ना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. त्यामुळे हा निधी गेला तरी कुठे, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

बोपदेव घाट हा पुणे आणि सासवडच्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असला, तरी रात्रीच्या वेळी हा परिसर निर्जन आणि धोकादायक बनतो.

काही महिन्यांपूर्वी अत्याचाराची घटना घडूनही रात्रीच्या वेळी तरुण-तरुणी घाटात मुक्त संचार करत असल्याचे पोलिसांच्या गस्तीमध्ये आढळून आले आहे.

मध्यरात्री पोलिसांच्या विशेष पथकाने घाटात गस्त घातली असता, काही दुचाकी संशयास्पद स्थितीत पार्क करण्यात आल्याचे दिसून आले. गाड्यांची तपासणी केली असता, तरुण-तरुणी घाटाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात थांबल्याचे आढळले.

यामध्ये दोन तरुणांसोबत एक तरुणीही आढळून आली. एका वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्याने त्यांना तातडीने समज दिली आणि परराज्यातील त्यांच्या पालकांशी संपर्क साधला.
या गस्तीदरम्यान पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवल्याने कुठलीही अनिष्ट घटना घडण्याआधीच थांबवली गेली. मात्र, बोपदेव घाट परिसरातील सुरक्षेचा प्रश्न आजही तसाच आहे.

अत्याचारासारख्या दुर्दैवी घटनेनंतर देखील येथे सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा झालेली नाही, हेच अधिक गंभीर आहे. प्रशासनाने लवकरात लवकर घाटात प्रकाश व्यवस्था आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

बोपदेव घाटातील सुरक्षेचा प्रश्न सरकार आणि प्रशासन कधी गंभीरपणे घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Reply