October 18, 2026

घराजवळ नोकरी पाहताय? पुणे जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी अंगणवाडी भरती सुरू…या तारखेपर्यंत घ्या लाभ

0
Punelive24 News (2)

Pune Anganwadi Bharti:- पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात गावपातळीवर बालकांच्या पोषण, शिक्षण आणि काळजीसाठी अत्यंत महत्त्वाचं काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या भरतीसाठी संधी चालून आली आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही एक चांगली संधी असून, घराजवळच नोकरी करत समाजसेवेचा भाग बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीमुळे अनेक घरांच्या उंबरठ्यावर एक नवा आत्मविश्वास, आर्थिक स्थैर्य आणि समाजात योगदान देण्याची उमेद पोहोचणार आहे.

अर्ज प्रक्रिया सुरू

एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच आयसीडीएस अंतर्गत ही भरती २६ जूनपासून सुरू झाली असून ९ जुलैपर्यंत अर्ज स्वीकारले जातील, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांनी दिली. या योजनेचा उद्देश लहान मुलांच्या पोषणासाठी आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी असतो. त्यामुळे स्थानिक महिलांनी पुढे येऊन या संधीचा उपयोग करावा, असा आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

या भरतीअंतर्गत नांदिवली आणि मातेरवाडी येथे अंगणवाडी सेविकांच्या दोन जागा उपलब्ध आहेत. तर नांदिवली, भडस, गावडेवाडी, शिलेश्वर, मुगाव, दिघेवाडी, खटपेवाडी, मोसे खुर्द, ताम्हिणी, गवारे वस्ती, खोटे, पिंपरी आणि अहिरवाडी या गावांमध्ये अंगणवाडी मदतनीसांच्या १३ जागा रिक्त आहेत. या जागांसाठी संबंधित गावांमधूनच अर्ज स्वीकारले जातील, म्हणजेच बाहेरील गावांतील उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार नाही. स्थानिक महिलांना प्राधान्य देण्याचा हेतू यामागे आहे, जेणेकरून गावातच काम करणं शक्य होईल.

या भरतीसाठी आवश्यक पात्रता

या पदांसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार महिला असणं आवश्यक आहे आणि त्या किमान १२ वी उत्तीर्ण असाव्यात. उमेदवाराचं वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. मात्र, विधवा महिलांना यामध्ये वयाची सवलत देण्यात आली आहे, आणि त्यांच्यासाठी ही मर्यादा ४० वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाच्या घोषणेसाठी प्रतिज्ञापत्र आणि आवश्यक कागदपत्रंही लागणार आहेत.

अर्ज कसा कराल?

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून इच्छुक आणि पात्र महिलांनी https://zppune-wcd.chanakyasoft.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा. या प्रक्रियेमुळे पारदर्शकता राखली जात असून गरजूंना योग्य संधी मिळवता यावी, हाच यामागचा उद्देश आहे.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading