Maharashtra Rain Alert : 4 एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस, कोणत्या जिल्ह्यांना धोका?
महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण असून उष्णतेची लाट जाणवत आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात उन्हाळ्यामुळे तापमान वाढले असतानाच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतीपिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टी भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. या पावसामुळे उन्हाळ्यात काहीसा गारवा मिळेल, मात्र शेतीसाठी हा पाऊस मोठे नुकसानकारक ठरू शकतो.
हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि काहींसाठी यलो अलर्ट जाहीर केला आहे. पुणे, सातारा, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुणे, नाशिक, नगर, जळगाव, सातारा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची किंवा काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. बुधवारी मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ऑरेंज अलर्ट राहील आणि त्यानंतर यलो अलर्ट लागू होईल.
सध्या हिमालय ते उत्तर भारतात पश्चिमी चक्रीय वात सक्रिय झाली आहे. तसेच तामिळनाडूमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे देशभर अवकाळी पावसाचा प्रभाव जाणवत आहे.
हिमालयापासून पूर्वोत्तर भारत, मध्य भारत, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील अनेक भागांत ४ एप्रिलपर्यंत या पावसाचा प्रभाव राहील. शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावे आणि हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
