रिक्षाचालकांसाठी RTO चा मोठा निर्णय, ‘या’ नियमांचं पालन न केल्यास होणार कडक कारवाई!
Pune RTO |पुण्यात रिक्षाचालकांसाठी एक महत्त्वाचा नियम लागू करण्यात आलेला आहे. आता रिक्षाचालकांना रिक्षा सेवा पुरवताना पांढरा शर्ट आणि खाकी पँट असा गणवेश परिधान करणे अनिवार्य केले आहे. याशिवाय, रिक्षाचालकांना ओळखपत्र देखील प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचे पालन न केल्यास पुणे आरटीओकडून कडक कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भातील पत्र पुणे आरटीओने नुकतेच जाहीर केले आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन कायदा, 1989 च्या नियम 21 च्या पोटनियम 18 मध्ये रिक्षाचालकांसाठी गणवेश आणि ओळखपत्र परिधान करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे रिक्षाचालकांची ओळख पटण्यास मदत होईल आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खात्री होईल. तरीही काही रिक्षाचालक या नियमाचे पालन करत नाहीत, ज्यामुळे पुणे आरटीओने ही कारवाई सुरू केली आहे.
कडक कारवाईची घोषणा
पुणे आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी या नियमाच्या पालनासाठी पत्र काढले आहे. पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, ज्यावेळी रिक्षाचालक गणवेश आणि ओळखपत्र परिधान केलेले नसतील, त्यावेळी मोटार वाहन कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
आरटीओच्या वायुवेग पथकांमार्फत वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर सातत्याने कारवाई केली जात असताना, आता रिक्षाचालकांसाठी एक विशेष तपासणी मोहीम राबवली जाईल. या मोहिमेअंतर्गत रिक्षाचालकांच्या गणवेश, ओळखपत्र आणि कागदपत्रांची तपासणी केली जाईल. विशेष पथकांची तैनाती करण्यात येईल आणि नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती पुणे आरटीओकडून देण्यात आली आहे.
नियमांचे पालन आवश्यक-
आरटीओने या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. रिक्षाचालकांना यापुढे गणवेश आणि ओळखपत्र न घालता सेवा पुरवली, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे रिक्षाचालकांनी या आदेशाचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
