राज्यावर पाणीटंचाईचं संकट! एप्रिल महिन्यातच धरणं ओस पडली, जाणून घ्या सध्या कोणत्या जिल्ह्यात किती पाणीसाठा उरलाय?
Maharashtra Water Crisis | महाराष्ट्रात उन्हाळ्याचे तापमान वाढत असताना धरणांमधील जलसाठ्यात देखील घट झाली आहे. यामुळे राज्यासमोर पाणीसंकट उभे राहिले आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावरच धरणांमध्ये फक्त ४१ टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. अजून दोन ते तीन महिने पावसाला बाकी असताना ही स्थिती चिंताजनक मानली जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
राज्यातील एकूण २,९९७ लहान-मोठ्या धरणांची एकत्रित जलसाठवण क्षमता सुमारे ४०,४९८ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मात्र ७ एप्रिलपर्यंत यातील केवळ ३०,०३४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे ४२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच कालावधीत राज्यातील जलसाठा ३५.१६ टक्के इतका होता. यंदा हे प्रमाण थोडे अधिक असले तरीही धरणांमधील जलस्तर कमी असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुण्यात सर्वात कमी पाणीसाठा-
या वर्षी विशेषतः पुणे विभागात सर्वात कमी पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये केवळ ३६.३१ टक्केच पाणी उरले आहे. जर पुढील महिन्यांमध्ये पाऊस लांबला तर या भागातील नागरिकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
राज्य सरकारने टंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार, सध्या २२३ टँकर १७८ गावांमध्ये आणि ६०६ वाड्यांमध्ये पाणी पोहोचवत आहेत. उन्हाळा अधिक तीव्र झाल्यास या टँकरांची संख्या वाढवावी लागणार आहे.
विविध भागांतील स्थिती-
राज्यातील विविध भागांतील पाणीसाठ्याची स्थिती पाहता अमरावती विभाग सर्वाधिक स्थिर असून तिथे ५०.०९ टक्के पाणी शिल्लक आहे. कोकणात ४९.९६ टक्के, नाशिकमध्ये ४३.९ टक्के, नागपूरमध्ये ४१.४९ टक्के आणि मराठवाड्यात फक्त ४०.४९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याचा वापर अत्यंत शहाणपणाने करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गरजेपुरतेच पाणी वापरणे, गळती थांबवणे, पुन्हा वापरता येणाऱ्या पाण्याचा वापर करणे या उपाययोजना अवलंबल्यास पाण्याचा अपव्यय रोखता येईल.
राज्यातील पावसाळा सुरू होण्यास अजून काही वेळ असल्यामुळे हा काळ अधिक महत्त्वाचा आहे. जर पाऊस लांबला तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे.
