पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस!, ज्येष्ठ महिलेला ‘डिजिटल कैदेत’ ठेवून तब्बल अडीच कोटींना लुटलं!
पुणे- पुण्यातल्या डेक्कन परिसरातली ही घटना आहे. एक शांत घर, एक ६० वर्षांची महिला आणि तिचा वाजणारा मोबाईल. स्क्रीनवर अनोळखी नंबर दिसतो. व्हॉट्सअॅपवरून एक व्हिडिओ कॉल येतो. समोरच्या बाजूला पोलिसांचा गणवेश घातलेली एक व्यक्ती गंभीर आवाजात म्हणते, “मी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे, नाशिकच्या गंगापूर पोलिस ठाण्यातून बोलतोय.
” पुढचं वाक्य ऐकून त्या महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. “तुमच्या बँक खात्याचा वापर एका मोठ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात झालाय. तुमच्या मुलाचंही नाव त्यात आहे. तुमच्यावर अटक वॉरंट निघू शकतं…” असं सांगत सायबर चोरट्यांनी त्या ज्येष्ठ महिलेला तब्बल महिनाभर ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये ठेवून २ कोटी ५७ लाख ५५ हजार रुपये लुटले.
शहरात सायबर फसवणुकीच्या घटना आता रोजच्याच झाल्या आहेत. पैशांच्या हव्यासापायी लोकही या जाळ्यात अडकतायत. कोणाची तीन लाखांची फसवणूक होते, तर कोणाची ३० लाखांची.
या फसवणुकीला आता काही मर्यादाच उरलेली नाही. सायबर चोरटे आता विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करतायत. त्यांची सगळी माहिती काढून ते लाखोंची लूट करतायत. या प्रकरणातही तेच झालं. त्या अनोळखी व्यक्तीने महिलेला नरेश गोयल नावाच्या एका कथित गुन्हेगाराचं छायाचित्र दाखवलं आणि म्हणाला, “तुमच्या खात्यातून या व्यक्तीच्या खात्यात पैसे गेलेत.
तुमच्या बँक खात्याची पडताळणी करावी लागेल. जर तुम्ही कुणाला सांगितलं, तर तुम्हाला अटक होईल. आता तुम्ही ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये आहात!” हे ऐकून ती महिला पुरती घाबरली. तिची धडधड वाढली आणि ती या फसव्या जाळ्यात अडकत गेली.
१५ फेब्रुवारीपासून हा सायबर चोरट्यांचा खेळ सुरू झाला. महिनाभर त्या महिलेला रोज नवे आदेश मिळाले. कधी धमकी, कधी दबाव, कधी मानसिक छळ. या सगळ्यात तिने घाबरून चोरट्यांनी सांगितलेल्या खात्यांमध्ये २ कोटी ५७ लाख ५५ हजार रुपये टाकले.
दररोज नवं टेन्शन, नवी भीती आणि सततचा ताण यात ती अडकली होती. पण १२ मार्चला तिचा अमेरिकेत राहणाऱ्या मुलाशी बोलणं झालं. तिने सगळी हकीकत सांगितली, तेव्हा मुलाने तिला लगेच सायबर पोलिसांकडे जायचा सल्ला दिला. मग ती धडधडत्या हृदयाने पोलिसांकडे गेली आणि सत्य समोर आलं.
या प्रकरणाचा तपास आता सायबर पोलिसांनी हाती घेतलाय. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे आणि पोलिस उपायुक्त डॉ. विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करतायत.
महिलेची तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. सुरुवातीच्या तपासात असं दिसतंय की, हा सायबर गोरखधंदा केरळ, चेन्नई आणि इतर काही भागांतील टोळीने चालवला असावा. चोरट्यांची काही बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
पण या सगळ्यात एक गोष्ट स्पष्ट आहे – सायबर गुन्हेगार आता किती शिताफीने आणि निर्लज्जपणे लोकांना लुटतायत. त्या ज्येष्ठ महिलेच्या आयुष्यभराच्या कमाईवर पाणी फिरलं, आणि आता पोलिस त्या चोरट्यांचा शोध घेतायत.
