३४व्या वर्षी तरुणाने केली ४ कोटींची बचत; ‘या’ तरुणाचा पैशाचा प्लॅन एकदा वाचाच
Financial Success Story
Financial Success Story : दिल्लीच्या उपनगरातून आलेल्या एका तरुणाने केवळ चिकाटी, शिस्त आणि साधं आयुष्य या तीन तत्त्वांवर आधार घेत आपल्या १० वर्षांच्या मेहनतीतून तब्बल ४ कोटी रुपयांची बचत केली आहे. कोणतीही लॉटरी, वारसा, किंवा परदेशी नोकरी नाही – फक्त न थांबणारा प्रयत्न आणि स्वप्नपूर्तीची जिद्द. या तरुणाची गोष्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक तरुणांसाठी ती स्फूर्तीस्थान बनली आहे.
हा ३४ वर्षीय टेक्नॉलॉजी एक्सपर्ट मूळचा एका छोट्याशा गावातील. त्याने रेडिटवरील ‘r/Noida’ या ग्रुपवर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणतो, “आज मी ३४ वर्षांचा आहे आणि माझी एकूण बचत ४ कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. कोणताही संपत्तीचा वारसा नाही, लॉटरी नाही, फक्त १० वर्षांची कठोर मेहनत, शिस्त आणि संयम यामुळे हे शक्य झालं.”
गरिबीतून सुरूवात, पण स्वप्न मोठं!
त्याचं बालपण अत्यंत हलाखीचं होतं. वडील मजुरीवर काम करायचे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही सरकारी हिंदी शाळेतून त्याने शिक्षण घेतलं. वडील नेहमी सांगायचे, “माझं नाव लोकांना तुझ्यामुळे माहित झालं पाहिजे.” हाच संवाद त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. पहिल्यांदा संगणक पाहिल्यावर त्याला वाटलं, “हेच माझं भविष्य आहे.”
कुठलीही मोठी ट्रेनिंग क्लासेस, कोचिंग किंवा गाईडशिवाय त्याने ऑनलाईन मोफत शैक्षणिक सामग्री आणि पुस्तकं वापरून स्वतःला घडवलं. चुकांमधून शिकत, अनुभवातून शिकत त्याने स्वतःला घडवलं.
त्याला जेव्हा फुल-टाईम नोकरी मिळाली, तेव्हाच त्याने पार्ट-टाईम सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स घेणं सुरू केलं. कमावलेले पैसे गाड्या, मोठे घर, दिखाव्यासाठी न खर्च करता तो दरमहा शिस्तीने बचत करू लागला. आजही त्याच्याकडे एक कार आणि एक बाईक आहे. घर घेण्याची घाई त्याने टाळली आहे. तो म्हणतो, “माझ्या वडिलांना माझ्या मेहनतीचा अभिमान वाटावा, फक्त संपत्तीचा नव्हे.”
