October 29, 2026

पुण्यात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा! थेट ऑलिम्पिक प्रवेशाची संधी; ५० देशांचे स्पर्धक होणार सहभागी

0
Pune Cycling Tour

Pune Cycling Tour

Pune Cycling Tour : पुणे जिल्हा आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेसाठी सज्ज होत आहे. ‘पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टूर’ या बहुचर्चित सायकलिंग स्पर्धेचं आयोजन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात होणार असून, ही स्पर्धा केवळ क्रीडा उत्सव नाही, तर पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या दिशेने एक मोठं पाऊल ठरणार आहे.

हे पण वाचा : ३४व्या वर्षी तरुणाने केली ४ कोटींची बचत; ‘या’ तरुणाचा पैशाचा प्लॅन एकदा वाचाच

या स्पर्धेच्या माध्यमातून पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून ६८९ किलोमीटर अंतरावर चार टप्प्यांत सायकलिंग स्पर्धा रंगणार आहे. विशेष म्हणजे, ही स्पर्धा जिंकणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकलपटूंना थेट लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळणार असल्याने जगभरातील क्रीडापटूंचं लक्ष पुण्याकडे लागलं आहे. सुमारे ५० देशांतील सायकलपटूंचा सहभाग अपेक्षित असून, १० हजारांहून अधिक स्पर्धकांची उपस्थिती संभाव्य आहे.

या स्पर्धेचा मार्ग युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (यूसीआय)च्या १५ सदस्यीय तज्ज्ञ पथकाकडून येत्या गुरुवारी (१० जुलै) पाहिला जाणार आहे. त्यानंतर अंतिम आराखडा जाहीर होईल. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या पुढाकाराने या स्पर्धेच्या आयोजनासाठी ‘सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डुडी यांनी माहिती दिली की, बालेवाडीपासून स्पर्धेला सुरुवात होणार असून, संपूर्ण मार्ग ‘झीरो वेस्ट कॉरिडॉर’ म्हणून विकसित केला जाईल. सुमारे ७०० किलोमीटरच्या रस्त्यांचं दर्जेदार डांबरीकरण, सौंदर्यीकरण व हरितीकरण करण्यात येणार आहे. हे काम पावसाळ्यानंतर दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच पीएमआरडीएला देण्यात आले आहेत.

या स्पर्धेमुळे पुण्याला केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे, तर पर्यटन, हॉटेल व्यवसाय, स्थानिक हस्तकला, खानपान आणि स्थानिक रोजगार याला मोठी चालना मिळणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष पुण्यावर केंद्रीत होणार असून, थेट प्रक्षेपण भारतासह अनेक देशांमध्ये होईल.

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, DA आणि निवृत्ती वयावर सरकारच ‘बिग अपडेट’ येणार? जाणून घ्या सविस्तर!

या उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली असून, स्पर्धेचा खर्च कंपन्यांच्या सीएसआर निधीतून केला जाणार आहे. दरवर्षी ही स्पर्धा आयोजित करण्याचा प्रशासनाचा मानस असून, दीर्घकालीन दृष्टिकोनातून ही स्पर्धा पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Leave a Reply