शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी! पुण्यात उभारला जाणार ९० फूट उंच शिवाजी महाराजांचा पुतळा; २९ कोटींचा प्रकल्प मंजूर
Shivaji Maharaj Statue Pune
Shivaji Maharaj Statue Pune : छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयात सजीव असलेला अभिमानाचा इतिहास! आता हाच इतिहास एका भव्य आणि प्रेरणादायी रूपात पुणेकरांसमोर उभा राहणार आहे. शहराच्या महत्त्वाच्या चांदणी चौक परिसरात तब्बल ९० फूट उंच ‘हिंदवी स्वराज्य शिल्प’ उभारले जाणार असून, यामध्ये ६० फूट उंच ब्राँझ धातूतील पूर्णाकृती पुतळा आणि ३० फूट उंच चौथरा असणार आहे.
या स्मारकासाठी बावधन खुर्द येथील सर्व्हे नंबर १९ आणि २० मधील ५,५४२ चौरस मीटर जागा निश्चित करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने या प्रकल्पाला यापूर्वीच मंजुरी दिली होती. आता त्याला अंतिम रूप देत २९ कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाला महापालिकेच्या एस्टीमेट कमिटीनेही हिरवा कंदील दाखवला आहे.
हे स्मारक केवळ उंचीनेच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही पुणेकरांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण करणार आहे. चांदणी चौक, वारजे, कोथरूड आणि मुळशी मार्गाच्या संगमावर हे स्मारक साकारले जाणार आहे. त्यामुळे वाहनचालक, प्रवासी आणि पर्यटक यांना सहज दिसणाऱ्या या ठिकाणी शिवरायांचं तेजस्वी रूप नेहमीच डोळ्यांसमोर राहणार आहे.
स्मारक परिसराचं सौंदर्यीकरणही तितकंच भव्य आणि देखणं असणार आहे. कमळाच्या पाकळ्यांच्या आकारातील कारंजे, स्टोन क्लॅडिंगसह प्रवेशद्वार, लाल आणि पिवळ्या दगडांचे पदपथ, रिटेनिंग वॉल, सीमाभिंती आणि उद्यानविषयक कामं यामध्ये समाविष्ट आहेत. शिवप्रेमींनी अनेक दिवसांपासून या ठिकाणी भव्य स्मारकाची मागणी केली होती. अखेर या मागणीतूनच हे स्वराज्यशिल्प साकारत आहे.
पूर्वी सुमारे ६ कोटी ५६ लाख रुपयांच्या निविदा प्रक्रियेत या स्मारकाचा प्रस्ताव छोट्या उंचीचा होता. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनुसार आणि शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन महापालिकेने सुधारित प्रस्ताव सादर करत पुतळ्याची उंची वाढवली.
हे पण वाचा : आजचा दिवस कसा असेल तुमच्यासाठी? जाणून घ्या ९ जुलैचं संपूर्ण राशिभविष्य!
महापालिकेचे भवन विभागाचे अधीक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे यांनी सांगितले की, “हे स्मारक केवळ एक स्थापत्य नसून, शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि प्रेरणेची जिवंत प्रतीमा आहे. भविष्यात हे स्मारक शहरातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक व प्रेरणादायी केंद्र ठरेल.”
