गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! शेअर बाजार सावरला, महागाई घसरणीचा थेट फायदा
Sensex Today
Sensex Today : सलग काही दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजाराने आज जोरदार उभारी घेतली असून गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचा किरण उमटला आहे. मंगळवारी आठवड्याच्या दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने सकाळच्या व्यवहारातच सकारात्मक वाटचाल करत बाजारात उत्साह निर्माण केला. आयटी, फार्मा आणि रिअल्टी क्षेत्रातील प्रमुख शेअर्समध्ये खरेदीचा ओघ पाहायला मिळाला.
हे पण वाचा : पुणेकरांनो, खबरदारी घ्या! गुरुवारी ‘या’ भागांमध्ये संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद!
बीएसई सेन्सेक्स आज सकाळी १८१ अंशांनी वधारत ८२,४१८.२१ वर उघडला, तर एनएसई निफ्टीने ०.२२ टक्क्यांची भर घालत २५,१३७.१० चा टप्पा गाठला. मागील काही सत्रांपासून बाजारात सतत घसरणीचं वातावरण होतं, मात्र आजच्या सकाळपासूनच ग्रीन झोनमध्ये सुरूवात झाल्याने गुंतवणूकदारांनी दिलासा घेतला.
या सकारात्मक बदलामागे दोन प्रमुख कारणं आहेत – महागाई दरातील ऐतिहासिक घसरण आणि भारत-अमेरिका व्यापार चर्चांतील प्रगती. सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात किरकोळ महागाई दर म्हणजेच सीपीआय २.१ टक्क्यांवर आला असून हा गेल्या सहा-साडेसहा वर्षातील सर्वात नीचांकी स्तर आहे. अन्नपदार्थांच्या दरांमध्ये झालेली घसरण यामागचं मुख्य कारण ठरली. या घटनेचा थेट फायदा सामान्य ग्राहकांपासून ते कंपन्यांच्या आर्थिक गणितांपर्यंत सर्वांनाच होणार आहे.
यासोबतच, भारत आणि अमेरिका यांच्यातील संभाव्य व्यापार कराराच्या अनुषंगाने नवे संकेत मिळाले आहेत. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांतील चर्चेला गती मिळाली असून या आठवड्यात भारतीय शिष्टमंडळ अमेरिकेत पोहोचून अंतिम टप्प्यातील वाटाघाटी करत आहे. यामुळे जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरचा विश्वास अधिक मजबूत झाला आहे.
गुंतवणूकदारांच्या व्यवहारावर नजर टाकल्यास, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) सलग दुसऱ्या दिवशी ५,१५० कोटींची विक्री केली असली तरी देशांतर्गत गुंतवणूकदारांनी या घसरणीचा फायदा घेत १,८०० कोटी रुपयांची खरेदी केली आहे. यामुळे बाजारात स्थैर्य टिकून आहे आणि दबावाखालीही सकारात्मक दिशा दिसत आहे.
हे पण वाचा : पुण्यातील टेकड्यांवरील राडारोड्यावर सरकारची मोठी कारवाई, वनमंत्र्यांचा दणदणीत निर्णय!
तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर HCL टेक, टाटा टेक्नॉलॉजीज, सन फार्मा, ओबेरॉय रिअल्टी, दीपक फर्टिलायझर्स आदी कंपन्यांचे शेअर्स आज विशेष लक्षात राहिले. या कंपन्यांचे निकाल आणि व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनामुळे पुढील व्यवहारांमध्येही त्यांच्याकडे गुंतवणूकदारांचा कल राहण्याची शक्यता आहे.
जागतिक बाजारातही सुधारणा दिसून आली आहे. अमेरिकन नॅसडॅक निर्देशांकाने नव्या उच्चांकाला गवसणी घातली असून डाऊ फ्युचर्स आणि जपानच्या निक्केईमध्येही सुधारणा झाली आहे. गिफ्ट निफ्टीही सकाळी २५,१७५ च्या आसपास स्थिर राहिला.
