पुणेकरांनो, खबरदारी घ्या! गुरुवारी ‘या’ भागांमध्ये संपूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद!
Pune Water Supply
Pune Water Supply : पावसाळ्याच्या दिवसांमध्येही पुणेकरांना पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पर्वती रॉ वॉटरमधील मुख्य वाहिनीची मोठी दुरुस्ती करण्याचे काम गुरुवारी, १७ जुलै रोजी हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेने नागरिकांना आधीच सतर्क करत पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे.
हे पण वाचा : पुण्यातील टेकड्यांवरील राडारोड्यावर सरकारची मोठी कारवाई, वनमंत्र्यांचा दणदणीत निर्णय!
या दुरुस्तीमुळे पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासह संलग्न सर्व जलकेंद्रे आणि टाक्यांचा पुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. परिणामी गुरुवारी शहरातील अनेक प्रमुख भागांमध्ये पाण्याचा थेंबही मिळणार नाही. या ठिकाणी शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू केला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दुरुस्तीच्या कामामुळे पुण्यातील जुने पर्वती दर्शन, मुकुंदनगर, दत्तवाडी, डेक्कन, शिवाजीनगर, औंध, पुणे विद्यापीठ परिसर, खडकी, स्वारगेट, सहकारनगर, बिबवेवाडी, गंगाधाम, इंदिरानगर, कोंढवा, भाग्योदयनगर, मिठानगर, आणि साईबाबानगर या भागांमध्ये पाणीपुरवठा ठप्प होणार आहे.
तसेच कोथरूड, वारजे माळवाडी, हिंगणे, कर्वेनगर, बावधन, पाषाण, सुस रोड, बाणेर, बालेवाडी, चाकणकर मळा, विजयनगर, वारजे जकात नाका, हरिगंगा सोसायटी, एनडीए रोड, मुळा रोड आणि न्यू कोपरे या भागांनाही या दुरुस्तीचा फटका बसणार आहे.
यासोबतच लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, प्रभात रोड, जनवाडी, भांडारकर रोड, दशभुजा गणपती, नळस्टॉप, मयूर कॉलनी, एरंडवणा, नवसह्याद्री आणि ताथवडे उद्यान परिसरातही गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की, हे काम अत्यावश्यक स्वरूपाचे असून, गळती रोखण्यासाठी ते तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे आणि गुरुवारी पाणी जपून वापरावे, असा पुनरुच्चार महापालिकेकडून करण्यात आला आहे.
हे पण वाचा : आज हवामानात मोठा बदल! पुण्यासाठी हवामान खात्याचा अलर्ट; जाणून घ्या आजचे अंदाज
या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी घरगुती गरजांसाठी पाणी साठवून ठेवावे, टाकी, बादल्या, ड्रम यांचा योग्य वापर करावा. तसेच अनावश्यक वापर टाळावा. पाण्याच्या तुटवड्यामुळे रोजच्या व्यवहारात अडथळा येऊ नये यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
दुरुस्तीच्या कामामुळे काही भागात शुक्रवारीही पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता असून, संपूर्ण स्थिती पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागू शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
