Jane Street ला भारतीय बाजारात पुन्हा एंट्री, सेबीकडून कडक अटींसह परवानगी
Jane Street India Trading
Jane Street India Trading : भारतीय शेअर बाजारात मोठ्या हालचाली घडवणाऱ्या आंतरराष्ट्रीय फर्म ‘जेन स्ट्रीट’ला पुन्हा एकदा देशांतर्गत व्यवहार करण्यास सेबीने परवानगी दिली आहे. मात्र, यावेळी ही परवानगी ‘मोकळ्या हाताने’ दिली नसून, कडक अटी, बंधने आणि शिस्तीच्या चौकटीतच देण्यात आली आहे. ज्या वर्तनामुळे जेन स्ट्रीटवर बंदी आली होती, त्याचं पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सेबी आणि प्रमुख स्टॉक एक्सचेंजेस एनएसई आणि बीएसईने यांच्यावर नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे पण वाचा : सलग 24 दिवस अप्पर सर्किट! ‘हा’ शेअर गुंतवणूकदारांना करत आहे मालामाल
जेन स्ट्रीट ही अमेरिका स्थित एक प्रमुख ट्रेडिंग फर्म आहे, ज्याच्यावर याआधी भारतीय शेअर बाजारात कथितपणे किंमतींची छेडछाड आणि ऑप्शन मार्केटमध्ये दिशाभूल करणारे व्यवहार केल्याचा आरोप होता. त्यामुळेच सेबीने कंपनीवर बंदी घातली होती. परंतु अलीकडेच, 56.7 कोटी रुपयांची भरपाई रक्कम जमा केल्यानंतर, सेबीने कंपनीवरील तीव्र कारवाई मागे घेतली आहे.
विशेष म्हणजे, या नव्या परवानगीच्या अटींपैकी एक म्हणजे जेन स्ट्रीट आता ऑप्शन ट्रेडिंग करू शकणार नाही. सेबीच्या तपासणीनुसार, याआधी जेन स्ट्रीटनं बँक निफ्टीशी संबंधित शेअर्समध्ये सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात खरेदी करून निर्देशांक वाढवायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दिवसभरात किंवा मासिक एक्सपायरीच्या वेळेस त्या पोझिशन्स विकून पुन्हा बाजार खाली खेचण्याचा खेळ केला जात होता. या माध्यमातून कंपनीला मोठा आर्थिक फायदा मिळत होता, जो सरळ सरळ बाजाराच्या पारदर्शकतेला आणि सामान्य गुंतवणूकदारांच्या हिताला धोका होता.
हे पण वाचा : दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांची मोठी खरेदी; ‘या’ शेअरने 1 वर्षात दिला 150% परतावा
या सर्व पार्श्वभूमीवर, जेन स्ट्रीटनं सेबीला लेखी आश्वासन दिलं आहे की, भविष्यात कोणताही गैरप्रकार केला जाणार नाही. तसेच, एनएसई आणि बीएसईला जेन स्ट्रीटच्या प्रत्येक हालचालीवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणजेच, यावेळी बाजारात परतताना जेन स्ट्रीटला ‘स्वातंत्र्य’ मिळालं असलं तरी ते ‘जबाबदारी’च्या आणि ‘कायद्याच्या दोऱ्यां’त घट्ट बांधलेलं आहे.
