शैक्षणिक कर्जासाठी वेटिंग संपलं! सरकारी आदेशानुसार आता १५ दिवसांतच मंजुरी मिळणार
Education Loan Approval
Education Loan Approval : शिक्षणासाठी कर्ज घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारी बँकांकडून एज्युकेशन लोन मिळण्यासाठी आता महिनोंमहिने वाट पाहावी लागणार नाही. केंद्र सरकारने स्पष्ट आदेश दिले असून, शिक्षण कर्जाच्या अर्जावर बँकांनी केवळ १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशी सक्त सूचना दिली आहे. त्यामुळे शैक्षणिक स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार आहे.
हे पण वाचा : पुणेकरांना दिलासा! येरवड्यात वाहतूक कोंडी मिटवणारा ११६ कोटींचा मास्टरप्लॅन मंजूर
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने नुकतेच सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांना याबाबत पत्र पाठवले आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जावर निर्धारित कालावधीत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे. इतकंच नव्हे, तर कर्ज फेटाळताना संबंधित विद्यार्थ्याला स्पष्ट कारण लेखी स्वरूपात कळवावे लागणार आहे. तसेच, असा नकार वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मंजुरीनंतरच मान्य धरला जाणार आहे.
हा निर्णय अचानक घेण्यात आलेला नसून मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींनंतर आणि बँकांबरोबर झालेल्या चर्चेनंतर हा पाऊल उचलण्यात आले आहे. अनेक वेळा कर्ज मंजूर होऊनही अंतिम रकमेत विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येत होते. या पार्श्वभूमीवर आता बँकांनी स्वतःची क्रेडिट प्रोसेसिंग प्रणाली सुधारावी, केंद्रिय प्रणालीशी जोडणी करावी आणि SOP (Standard Operating Procedure) तयार करावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
हे पण वाचा : धक्कादायक! जवळच्या व्यक्तीनेच केली आलिया भट्टची ७७ लाखांची फसवणूक
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. बँकांनी विद्या लक्ष्मी (vidyalakshmi.co.in) या अधिकृत पोर्टलशी आपली प्रणाली जोडण्यासही सुरुवात केली आहे. हे पोर्टल शिक्षण कर्जासाठी सुलभ माध्यम ठरत असून, अर्जदार आणि बँक यांच्यातील दुरावा कमी करत आहे.
सरकारने मे २०२५ पर्यंतच्या सर्व प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन तातडीने निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अर्जाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे.
