October 30, 2026

पुणेकरांना दिलासा! येरवड्यात वाहतूक कोंडी मिटवणारा ११६ कोटींचा मास्टरप्लॅन मंजूर

0
Yerawada Flyover Pune

Yerawada Flyover Pune

Yerawada Flyover Pune : येरवडा, संगमवाडी आणि बंडगार्डन परिसरातील नागरिकांनी वर्षानुवर्षे भोगलेली वाहतूककोंडी लवकरच इतिहासजमा होणार आहे. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने या भागातील वाहतूक सुलभीकरणासाठी उड्डाणपूल आणि दोन भुयारी मार्ग उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. अंदाजे ११६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी ‘कलम ७२ ब’ अंतर्गत खर्चाचे दायित्व स्वीकारण्यात आले आहे.

हे पण वाचा : धक्कादायक! जवळच्या व्यक्तीनेच केली आलिया भट्टची ७७ लाखांची फसवणूक

येरवड्याच्या बिंदुमाधव बाळासाहेब ठाकरे चौकातून उड्डाणपूल सुरू होणार असून, तो थेट खडकीच्या दिशेने जाणार आहे. या चौपदरी पुलाची लांबी रॅम्पसह ९०८ मीटर असून रुंदी १५.६० मीटर इतकी असेल. यामुळे बंडगार्डन, खडकी, येरवडा आणि विमानतळ या सर्वच दिशांनी होणारी वाहतूक अधिक सुसाट आणि सुरळीत होणार आहे.

या पुलासोबतच दोन भुयारी मार्गांचीही आखणी करण्यात आली आहे. संगमवाडीहून विमानतळ आणि संगमवाडीहून बंडगार्डनकडे जाणारे हे ग्रेड सेपरेटर असून, अनुक्रमे २१९ मीटर व २८९ मीटर लांबीचे असतील. त्यात ६० व ८० मीटर इतके भाग बंदिस्त स्वरूपात बांधले जाणार आहेत. हे दोन्ही मार्ग सात मीटर रुंद असणार आहेत.

या प्रकल्पासाठी महापालिकेने चालू आर्थिक वर्षात केवळ ८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, पूर्ण प्रकल्पासाठी लागणारा निधी जास्त असल्याने, उर्वरित खर्च महापालिका पुढील काही वर्षांमध्ये ‘कलम ७२ ब’ अंतर्गत उचलणार आहे. त्यामुळे निधीअभावी प्रकल्प रखडण्याचा धोका टळला आहे.

पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहराच्या विस्तारामुळे मध्यवर्ती भागात प्रचंड वाहतूक दबाव निर्माण झाला आहे. येरवड्याचा परिसर शहराच्या पूर्व-पश्चिम जोडणीसाठी महत्त्वाचा दुवा आहे. विशेषतः सकाळ-संध्याकाळी कामावर जाणाऱ्या आणि परतणाऱ्या नागरिकांसाठी ही वाहतूककोंडी मोठा त्रासदायक अनुभव ठरत होती.

हे पण वाचा : पुणे ते नाशिक प्रवास अवघ्या ३ तासांत होणार; २८ हजार कोटींच्या महामार्ग प्रकल्पाला मंजुरी

हा प्रकल्प केवळ वाहनचालकांसाठीच नाही तर शहराच्या विकासासाठीही निर्णायक ठरणार आहे. वेळ आणि इंधनाची बचत, प्रदूषणात घट आणि सुरक्षित वाहतूक यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानिक रहिवासी, व्यावसायिक आणि कामकाजासाठी दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो लोकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरतेय.

Leave a Reply