धक्कादायक! जवळच्या व्यक्तीनेच केली आलिया भट्टची ७७ लाखांची फसवणूक
Alia Bhatt Fraud Case
Alia Bhatt Fraud Case : झगमगत्या सिनेसृष्टीमागे अनेकदा असतो एक सावलीचा चेहरा – आणि अशाच एका सावलीचा भयंकर चेहरा सध्या चर्चेचा विषय ठरतोय. अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या पर्सनल असिस्टंटने तब्बल ७७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने वेदिका प्रकाश शेट्टी हिला अटक केली असून, ती गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ हा ‘धोख्याचा खेळ’ खेळत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.
वेदिका शेट्टी ही आलियाच्या Eternal Sunshine Productions Pvt Ltd आणि वैयक्तिक बँक खात्यांशी संबंधित व्यवहार पाहत होती. तिच्या जबाबदारीचा फायदा घेत तिने बनावट बिलं, खोट्या सह्या आणि काल्पनिक खर्च दाखवून कोट्यवधी रुपयांचा गोरखधंदा रचला. विशेष म्हणजे हे सर्व अत्यंत नियोजनपूर्वक आणि विश्वास संपादन करून केलं गेलं.
या फसवणुकीचं गूढ उकललं तेव्हा आलियाची टीम सुन्न झाली. अनेक महिन्यांपासून आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणाऱ्या आर्थिक सल्लागारांनी अखेर ही बेधडक फसवणूक हेरली. आलियाची आई सोनी राजदान यांनी यासंदर्भात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पाच महिन्यांच्या तपासानंतर वेदिकाला बंगळुरूतून अटक करण्यात आली. तिला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीत घेण्यात आलं आहे.
पोलीस तपासातून समोर आलंय की, वेदिकाने काही खर्च कधी झालेच नाहीत, तरीही त्याची खोटी कागदपत्रं तयार केली आणि रक्कम आपल्या खात्यात वळवली. यात आलियाच्या सह्याही बनावट होत्या. ही केवळ आर्थिक फसवणूक नव्हे, तर विश्वासघातही होता – कारण ज्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळलं जातं, त्या व्यक्तीकडूनच असा विश्वासघात झाल्याचं टीमचं म्हणणं आहे.
या संपूर्ण प्रकरणावर अद्याप आलिया किंवा तिच्या प्रॉडक्शन हाऊसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सूत्रांनुसार यापुढे कंपनीच्या आर्थिक व्यवस्थापनावर अधिक कडक नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं.
