Aadhar Card Update: आता आधार कार्ड झेरॉक्स वापरण्याची गरज नाही! UIDAI ने घेतला मोठा निर्णय
Aadhar Card Update:- आधार कार्ड हे भारतातील सर्वांत महत्त्वाचं ओळखपत्र बनलं आहे. सरकारी योजना असो, शासकीय कामकाज असो किंवा बँक, मोबाईल सिमपासून ते शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशापर्यंत अनेक ठिकाणी आधार अनिवार्य झाले आहे. त्यामुळे आधार कार्ड सातत्याने जवळ ठेवण्याची सवय आता नागरिकांमध्ये झाली आहे. काही लोक आधारची फोटोकॉपी (झेरॉक्स) सतत करून ठेवतात तर काही जण मोबाईलमध्ये डिजिटल फॉरमॅटमध्ये आधार जपतात.
मात्र, अनेकदा झेरॉक्स सादर करणे हे वेळखाऊ आणि कधी कधी खाजगी माहितीची गोपनीयता धोक्यात आणणारे ठरते. आता यावर कायमचा उपाय मिळणार आहे, कारण युआयडीएआयने (UIDAI) आधारसंदर्भातील एक नवी आणि अत्याधुनिक डिजिटल सुविधा विकसित केली आहे ज्यामुळे घरबसल्या आधार अपडेट करणे शक्य होणार आहे.
कशी आहे ही नवीन सेवा?
ही नवीन सेवा पूर्णतः डिजिटल असून, आधार कार्डधारकांना त्यांचा पत्ता, फोन नंबर, नाव, किंवा जन्मतारीख अपडेट करण्यासाठी आधार केंद्रात प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच आता घरबसल्या मोबाईल फोनवरून किंवा एका अॅपच्या माध्यमातून हे सगळे बदल शक्य होतील. या सेवेमध्ये बायोमेट्रिक पडताळणी (फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन) वगळता इतर सर्व अपडेट्स ऑनलाइन करता येणार आहेत. यासाठी युआयडीएआयने एक नवीन अॅप विकसित केलं आहे ज्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे 2000 मशीनचा समावेश करण्यात आला आहे, आणि हळूहळू देशभरात ही सेवा उपलब्ध होईल.
आधार कार्डवरील माहिती अपडेट करण्यासाठी काय करावे?
यापुढे आधार कार्डवरील माहिती अपडेट करताना वापरकर्त्याला स्वतंत्र कागदपत्र सादर करण्याची गरज नाही. नव्या प्रणालीमुळे जन्मदाखला, मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, पॅन कार्ड, पीडीएस आणि मनरेगा यांसारख्या डेटाबेसमधून संबंधित माहिती आपोआप घेण्यात येणार आहे. इतकंच नव्हे, तर युआयडीएआय आता वीजबिल डेटाबेस वापरून सुद्धा नागरिकांचा पत्ता पडताळण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे बनावट कागदपत्रे सादर करून आधार बनवणाऱ्या घटकांवर आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जातो.
नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने QR कोड आधारित डिजिटल आधार कार्ड अधिक सुरक्षित बनणार असून, हे कार्ड मोबाईल-टू-मोबाइल किंवा अॅप-टू-अॅप शेअर करता येणार आहे. म्हणजेच, हॉटेलमध्ये चेक-इन करताना, प्रवास करताना, सरकारी किंवा खासगी कार्यालयात ओळख सादर करताना फोटोकॉपीची गरज पडणार नाही. वापरकर्ता आपली माहिती केवळ त्याच्या संमतीनेच समोरच्याशी शेअर करू शकेल. यामुळे नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक डेटावर अधिक नियंत्रण मिळेल आणि गोपनीयता अधिक चांगल्या प्रकारे राखता येईल.
युआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, ही प्रणाली 2025 अखेरपर्यंत पूर्णतः कार्यरत होईल. यानंतर आधार अपडेट संबंधित कामांसाठी लांबच लांब रांगा, कागदपत्रांची झेरॉक्स किंवा ऑफिसच्या फेऱ्या टाळता येतील. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी ही सेवा वरदान ठरेल कारण त्यांना लांबच्या शहरात जाऊन केंद्रात हजेरी लावावी लागते. ही प्रणाली लागू झाल्यानंतर आधार अपडेट करणे हे अगदी सहज, पारदर्शक आणि सुरक्षित बनणार आहे.
