26 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा पाहून आजही अनेकांची झोप उडते; काजोल-संजयचा ‘हा’ सिनेमा पाहिलात का?
Dushman Movie 1998
Dushman Movie 1998 : सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थ्रिलर आणि सायको ड्रामा यांचा सुकाळ झाला असला, तरी १९९८ साली आलेला एक सिनेमा आजही लोकांच्या अंगावर शहारे आणतो. ‘दुश्मन’… एक असा सिनेमा, ज्याने प्रेक्षकांची झोप उडवली होती. त्यावेळच्या प्रेक्षकांनी या सिनेमानंतर अनेक दिवस रात्रंदिवस अस्वस्थतेत घालवले. त्यात खलनायकाची भीती तर अशी, की त्याचं नाव जरी घेतलं तरी आजही अनेकांच्या अंगावर काटा येतो!
हे पण वाचा : २५ वर्षांनी झी मराठीवर कमबॅक! ‘ही’ अभिनेत्री पुन्हा मालिका गाजवण्यासाठी सज्ज
‘दुश्मन’ हा सिनेमा म्हणजे एक परिपूर्ण सायको थ्रिलर. या चित्रपटात केवळ क्रौर्य नव्हे, तर भावनिक गुंताही आहे. कथेचा केंद्रबिंदू असलेला खलनायक ‘गोकुळ पंडित’… म्हणजेच अभिनेते आशुतोष राणा यांची भूमिका, आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट खलनायकाच्या यादीत अग्रक्रमावर मानली जाते. गोकुळ पंडित हा एक मानसिक विकृती असलेला खून करणारा नराधम. चित्रपटात त्याने दाखवलेलं अमानवी, विकृत रूप इतकं प्रभावी होतं की ते पाहून प्रेक्षक दचकतात. आशुतोष राणा यांच्या कारकिर्दीतील हा निर्णायक टप्पा ठरला.
चित्रपटात अभिनेत्री काजोल हिने दुहेरी भूमिका साकारली आहे – सोनिया आणि नैना सेहगल या जुळ्या बहिणींची. गोकुळ पंडितकडून सोनियाचा क्रूर खून होतो आणि त्यानंतर नैना आपल्या बहिणीच्या खुन्याचा सूड घेण्याचा निर्णय घेते. यातच सुरू होतो एक धक्कादायक प्रवास… एका अशक्त, शांत स्वभावाच्या मुलीचा, जो तिला एका निर्दयी सायकोपासून वाचवतो आणि शेवटी त्याचं कायमचं नाश करतो.
संजय दत्त या चित्रपटात एका अंध सैनिकाच्या भूमिकेत आहे. तो नैनाला प्रशिक्षण देतो, मानसिक बळ देतो आणि अखेरीस तिच्या सूडयात्रेचा भाग बनतो. संजय दत्तची ही व्यक्तिरेखा चित्रपटात फारशा संवादात नाही, पण त्याचं अस्तित्व अत्यंत ठसठशीत आहे.
‘दुश्मन’ चित्रपट केवळ एका खलनायकाच्या भयानकतेवर उभा राहिलेला नाही, तर तो भावनिकदृष्ट्याही ताकदवान आहे. बहिणीच्या मृत्यूनंतर नैनाने घेतलेला ध्यास, तिचं बदलत जाणारं व्यक्तिमत्व, तिची हिम्मत – हे सगळं पाहताना प्रेक्षक सिनेमात पूर्णपणे गुंततात.
