पुन्हा सुरु होतोय पाऊस! आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये रेड, ऑरेंज अलर्ट? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Weather Forecast
Weather Forecast : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने अचानक विश्रांती घेतली होती. अनेक भागांत शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागून राहिले होते. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात दमदार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले असून, कोकण आणि घाटमाथा भागात विशेषतः मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे पण वाचा : आज कोणाला लाभ? कोणाला धोका? तुमची रास काय सांगते ते जाणून घ्या!
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, गुरुवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, पुणे, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचा अर्थ या भागांमध्ये काही ठिकाणी अतिरेकी पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक या जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हे भाग दरवर्षी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित होतात. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
विदर्भातही पावसाने हजेरी लावण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे या भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यांतही अधूनमधून पावसाच्या सरी येतील.
हे पण वाचा : शेअर बाजारात घसरण! निफ्टी 25,200च्या खाली; कोणते शेअर्स वधारले?
राज्यात इतरत्र हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित असून, उन्हाच्या झळांपासून त्रस्त असलेल्या भागांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या मुसळधार पावसाचा थेट परिणाम शेतीच्या कामांवर, वाहतूक व्यवस्थेवर आणि दैनंदिन व्यवहारांवर होण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकणातल्या नद्या आणि ओढ्यांना पूर येण्याचा धोका असून, शेतकऱ्यांनी शेतीसंबंधी आवश्यक खबरदारी घ्यावी.
