जगात फक्त ‘हा’ एकच देश जे काहीच आयात करत नाही, कोणावरही अवलंबून नाही; नाव ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Guyana
Guyana : जगभरात बहुतेक देश विविध अन्नपदार्थ, धान्ये, भाज्या किंवा फळे आयात करूनच आपल्या लोकांचा उदरनिर्वाह करत असताना, एक लहानसा देश – गयाना – जगासमोर अन्न सुरक्षेचं एक वेगळंच उदाहरण बनून उभा राहिला आहे. एका नव्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार, गयाना हा संपूर्ण जगातला एकमेव देश आहे जो आपल्या लोकांना आवश्यक असलेले सातही प्रमुख अन्नगट पूर्णपणे देशांतर्गत पातळीवर उत्पादन करू शकतो. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल, पण ही वस्तुस्थिती आता वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाली आहे.
गयाना हा दक्षिण अमेरिकेतील एक छोटा पण नैसर्गिक सौंदर्याने नटलेला देश आहे. धबधबे, घनदाट जंगले, स्वच्छ नद्या आणि भरपूर पावसामुळे येथे अन्न उत्पादनासाठी अत्यंत अनुकूल हवामान आहे. पण फक्त नैसर्गिक साधनसंपत्ती असून चालत नाही; गयाना यशस्वी ठरतोय तेथील प्रामाणिक, मेहनती आणि कष्टकरी जनतेमुळे. या देशात शेतकरी काळाबाजार करत नाहीत, अन्न साठवून ठेवत नाहीत आणि सरकारला गाफील ठेवत नाहीत. त्यामुळेच येथे अन्नधान्य, डाळी, भाज्या, फळे, तांदूळ, गहू आणि सोयाबीन यांचं भरपूर आणि वेळेवर उत्पादन होतं.
‘नेचर फूड’ या नामवंत विज्ञान मासिकात प्रसिद्ध झालेल्या आणि ‘सायन्स फोकस’ या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर हायलाइट झालेल्या अभ्यासात हे स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की, १८६ देशांपैकी फक्त गयानाच असा आहे की जो कोणतीही अन्न आयात न करता आपल्या सर्व लोकांची पोषण गरज पूर्ण करू शकतो.
पाश्चात्य आणि विकसित देशांना मागे टाकत गयानाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. आज अमेरिका, युरोपमधील बड्या देशांनाही काही प्रमाणात अन्न आयात करावी लागते. पण गयाना मात्र या शर्यतीत सर्वात पुढे आहे. आणि हे केवळ कृषी उत्पादनामुळेच नाही, तर सामूहिक प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी यामुळे शक्य झालं आहे.
गयानाची आणखी एक खासियत म्हणजे तेथील पर्यटन. नैसर्गिक सौंदर्य, शांत वातावरण आणि चविष्ट स्थानिक अन्न यामुळे लाखो भारतीय पर्यटक दरवर्षी गयानाला भेट देतात. येथे जाताना कोणतीही अडचण येत नाही, उलट तेथील मैत्रीपूर्ण स्थानिक जनता पर्यटकांना आपलेसे करते.
