70 तास कामाचे आवाहन करणाऱ्या मूर्तींना झटका? इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम थांबवायला सांगितलं!
Narayana Murthy
Narayana Murthy : इन्फोसिस या देशातील अग्रगण्य आयटी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अलीकडेच कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम टाळण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, काम आणि खासगी आयुष्य यामध्ये समतोल राखण्याचे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे. हे निर्देश विशेषतः त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि मानसिक आरोग्याचा विचार करून देण्यात आले असून, प्रत्येक कर्मचाऱ्याला ठरवून दिलेल्या वेळेतच काम पूर्ण करण्याचे बजावले आहे.
विशेष म्हणजे, इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि देशातील आयटी क्षेत्राचे मार्गदर्शक समजले जाणारे नारायण मूर्ती यांनी याआधी ‘भारतीय तरुणांनी आठवड्याला ७० तास काम करायला हवे’ असा सल्ला दिला होता. पण कंपनीच्या सध्याच्या भूमिकेने त्यांच्या विधानाला छेद दिला आहे. त्यामुळे हा बदल चर्चेचा विषय ठरला आहे.
नुकतीच कोलकात्यामध्ये इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात नारायण मूर्ती म्हणाले होते, “भारताला महासत्ता बनवायचे असेल तर आपल्याला तरुणांच्या कठोर मेहनतीची गरज आहे. मेहनतीशिवाय प्रगती शक्य नाही.” याआधीही त्यांनी पाच दिवसांच्या आठवड्याच्या संकल्पनेचा विरोध केला होता आणि वर्क-लाईफ बॅलन्स ही संकल्पना त्यांनी फेटाळली होती.
पण इन्फोसिसने सध्या कर्मचाऱ्यांच्या तंदुरुस्तीला अधिक महत्त्व दिले आहे. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार, जे कर्मचारी पाच दिवसांच्या आठवड्यात रोज ९.१५ तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात, त्यांना विशेष ईमेलद्वारे काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. या मेलमध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की, “कामाचे निहित तास पूर्ण करून तुम्ही फक्त वैयक्तिक आयुष्यच समृद्ध करत नाही, तर व्यावसायिक दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करायलाही मदत करता.”
या संदेशात घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून दर आठवड्याचे सरासरी तास मागवले जात असून, नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. एवढेच नाही, तर अधूनमधून ब्रेक घेणे, मानसिक तणाव आल्यास काही वेळ काम थांबवणे, यासारख्या सल्ल्यांचा समावेशही या मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आला आहे.
हे पण वाचा : 6 महिने दारू न घेतल्यास शरीरात नेमके कोणते बदल होतात? ? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
या निर्णयावर अनेक कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आयटी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढणाऱ्या मानसिक तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिसच्या या कृतीला ‘मानवी केंद्रित धोरण’ म्हणून पाहिले जात आहे. नारायण मूर्तींच्या ७० तास कामाच्या विचाराच्या विरोधात जाऊन, इन्फोसिसने कर्मचारी हिताची बाजू उचलून धरल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
