पुण्यातील 123 कुटुंबांनी उभारलेलं एकमेव खासगी शहर तुम्हाला माहिती आहे का? वाचा कधीच न वाचलेली माहिती
Magarpatta City Pune
Magarpatta City Pune : पवार कुटुंबात सध्या लग्नसराईचा माहोल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरातील एकामागून एक विवाहसोहळे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. यामध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार या दोघांच्याही साखरपुडा समारंभाने लक्ष वेधलं आहे. मात्र याहून अधिक चर्चेत आहे ते आमदार रोहित पवार यांची सासरवाडी – कारण ती आहे थेट महाराष्ट्रातील एका खासगी पातळीवर विकसित झालेल्या अनोख्या शहरातील!
पुण्याजवळ असलेल्या मगरपट्टा सिटी या शहराची ओळख ही केवळ टाऊनशिप म्हणून नाही, तर ती महाराष्ट्रातल्या शहरी नियोजनातील एक क्रांती म्हणून झाली आहे. हे शहर सरकारने नव्हे, तर तब्बल 123 मगर कुटुंबांनी स्वतःच्या जमिनीवर विकसित केलं आहे. याच शहराचे संस्थापक आहेत सतीश मगर, जे आमदार रोहित पवार यांचे सासरे आहेत. त्यामुळे रोहित पवार हे मगरपट्टा सिटीचे जावई असल्याचं विशेष संबंध अधिक उठून दिसतो.
मगरपट्टा हे शहर सुमारे 430 एकरवर वसलेलं असून, या संकल्पनेचा उगम 1982 मध्ये झाला. पुणे महापालिकेच्या नियोजनात हा भाग ‘फ्युचर अर्बनायजेबल झोन’ म्हणून घोषित झाल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारच्या ताब्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, त्या वेळी ‘मगर’ आडनाव असलेल्या 123 कुटुंबांनी एकत्र येत जमिनी सरकारकडे न सोडता स्वतःच शहर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘मगरपट्टा टाउनशिप डेव्हलपमेंट’ ही कंपनी स्थापन केली आणि त्या माध्यमातूनच हे मॉडेल शहर उभं राहिलं.
सन 2000 नंतर मगरपट्टा सिटीचा झपाट्याने विकास झाला. आयटी पार्क, मॉल, बाजारपेठा, शाळा, हॉस्पिटल्स, प्रशस्त रस्ते आणि हिरवळ यामुळे हे शहर राहण्यासाठी एक आदर्श ठिकाण मानलं जातं. पुण्यातील उच्चभ्रू आणि सुसज्ज परिसरांमध्ये आज मगरपट्टाचं नाव अग्रस्थानी आहे.
