पुण्यात खळबळ! होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढण्यासाठी तरुणीने दिली दीड लाख रूपयांची सुपारी
पुणे- पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. होणारा नवरा आवडत नसल्यामुळे एका तरुणीने त्याला थेट जीवे मारण्याची सुपारी दिली. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, यवत पोलिसांनी पाच जणांना अटक केलीय.
पण सुपारी देणारी तरुणी मयुरी सुनील दांगडे ही सध्या फरार आहे. अटक केलेल्यांमध्ये आदित्य शंकर दांडगे, संदीप दादा गावडे, शिवाजी रामदास जरे, सुरज दिगंबर जाधव आणि इंद्रभान सखाराम कोळपे यांचा समावेश आहे. हे सर्वजण अहिल्यानगर जिल्ह्यातले आहेत.
ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी दांगडेच्या लग्नाशी जोडलीय. मयुरीचं लग्न कर्जत तालुक्यातल्या माही जळगाव इथल्या सागर जयसिंग कदम याच्याशी ठरलं होतं.
पण मयुरीला सागरशी लग्न करायचंच नव्हतं. त्यामुळे तिने आणि संदीप गावडे याने मिळून सागरला मारण्यासाठी तब्बल १ लाख ५० हजारांची सुपारी दिली. हा सगळा प्रकार यवत पोलिसांच्या तपासात उघड झाला आणि सगळ्यांना धक्काच बसला.
पोलिसांनी सांगितलं की, सागर कदम हा हॉटेलमध्ये कुकचं काम करतो. २७ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसातच्या सुमारास दौंड तालुक्यातल्या खामगाव फाट्याजवळ एका हॉटेल परिसरात ही घटना घडली.
यवत पोलिसांच्या हद्दीत काही जणांनी सागरला रस्त्यात अडवलं आणि लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर यवत पोलिसांत गुन्हा दाखल झाला आणि तपासाला सुरुवात झाली.
तपासात पोलिसांनी संशयित आदित्य शंकर दांडगे याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मग पोलिसांनी पाच जणांना अटक केली आणि या गुन्ह्यात वापरलेली वेरणा कंपनीची पांढरी कारही जप्त केली.
तपासात असं समोर आलं की, मयुरीला सागरशी लग्न करायचं नव्हतं, म्हणून तिने दीड लाख रुपये देऊन हा सगळा कट रचला. संदीप गावडेसह इतरांनी तिला या कामात साथ दिली.
या प्रकरणाने सगळीकडे खळबळ माजलीय. एका लग्नापासून पळण्यासाठी तरुणीने असा टोकाचा निर्णय घेतला, हे ऐकून लोक थक्क झालेत. सध्या मयुरी फरार आहे, तर पोलिस तिचा शोध घेतायत.
या सगळ्या प्रकरणाचा पुढचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने करत आहेत. ही घटना पुण्यात चर्चेचा विषय बनली असून, मयुरी पोलिसांच्या हाती कधी लागते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
