‘नावात छत्रपती लावा नाहीतर…, संभाजी ब्रिगेडला देण्यात आला इशारा!
पुणे- एक नवा वाद उफाळण्याची चिन्हं दिसतायत. ‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेला त्यांच्या नावावरून थेट इशारा देण्यात आलाय.
शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “संभाजी ब्रिगेडने आपल्या नावात बदल करून ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’ असं करावं किंवा संघटनेचं नावच बदलावं. नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन करू.” हा इशारा ऐकून महाराष्ट्रात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झालीय.
दीपक काटे यांनी आपलं म्हणणं मांडताना सांगितलं, “छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र, स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे संपूर्ण भारतासाठी आदर्श आहेत. पण महाराष्ट्रात ‘संभाजी ब्रिगेड’ ही संघटना त्यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान करतेय.
आम्ही याबाबत संघटनेकडून अनेकदा पत्रं पाठवली, भेटी घेतल्या, पाठपुरावा केला, पण त्यांच्याकडून काहीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते संतोष शिंदे आणि इतर पदाधिकारी एकीकडे म्हणतात की, संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांना कठोर शिक्षा करू, त्यांना महाराष्ट्रात राहू देणार नाही.
पण दुसरीकडे स्वतःच्याच संघटनेच्या नावात ‘संभाजी’ असा एकेरी उल्लेख ते सर्रास करतात. आम्ही बदलाची मागणी केली, पण त्याकडे त्यांनी कानावर हात ठेवले.”
त्यांनी पुढे सांगितलं, “संभाजी ब्रिगेडने आपल्या नावात ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ असं पूर्ण लिहावं. जर त्यांनी असं नाव बदललं नाही, तर या संघटनेची आणि पक्षाची नोंदणी तातडीने रद्द करावी.
छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान राखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर पावलं उचलावीत आणि अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे. जर ही मागणी मान्य झाली नाही, तर शिवभक्त आणि शंभूभक्तांच्या भावना दुखावणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या विरोधात आम्ही ३ एप्रिल २०२५ पासून राज्यभर आंदोलन करणार आहोत.
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, ठाणे, रायगड या सगळ्या ठिकाणी हे आंदोलन तीव्र असेल.”
हा विषय आता काय वळण घेतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संभाजी ब्रिगेड आपल्या नावात बदल करणार का, की हा वाद आणखी पेटणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दीपक काटे यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे राज्यात पुन्हा एकदा इतिहास आणि सन्मानाचा मुद्दा चर्चेत आलाय.
