मोठी बातमी! गणेशोत्सवात ‘ही’ गोष्ट केली तर पुनीत बालन पैसे देणार नाहीत; दिला गंभीर इशारा
Pune Ganeshotsav
Pune Ganeshotsav : पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवाला साजेसा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या आवाजातील डीजे, अश्लील गाणी आणि जल्लोषाच्या नावाखाली होणाऱ्या संस्कृतीविरोधी प्रकारांना आळा बसावा, यासाठी त्यांनी आता आर्थिक मदतीच्या स्वरूपात थेट अट घालून स्पष्ट इशारा दिला आहे – “डीजे लावणार्या गणेश मंडळांना यापुढे मदत नाही!”
हे पण वाचा : राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय! लाखो नागरिकांना मिळणार आपल्या हक्काची जमीन
पुनीत बालन हे ‘समर्थ प्रतिष्ठान’च्या ढोल-ताशा पथकाच्या वाद्यपूजन सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार हेमंत रासणे यांचीही उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांचं स्मरण करत गणेशोत्सवाच्या मूळ उद्देशावर भर दिला.
“१३२ वर्षांपूर्वी या उत्सवाची सुरुवात लोकजागृतीसाठी आणि सामाजिक एकतेसाठी झाली होती. आज मात्र काही मंडळांकडून मोठ्या आवाजात डीजे आणि अश्लील गाण्यांच्या माध्यमातून या परंपरेला गालबोट लावलं जातंय, हे खेदजनक आहे,” असं ते म्हणाले.
बालन ग्रुपकडून दरवर्षी अनेक गणेश मंडळांना आर्थिक सहाय्य दिलं जातं. या साहाय्याचा उद्देश म्हणजे मंडळांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, चांगले सामाजिक उपक्रम राबवावेत आणि उत्सव सुसंस्कृत पद्धतीने साजरा करावा. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये काही मंडळांकडून हा उद्देश बाजूला ठेवून ‘धमाल’ आणि ‘गोंगाट’ यांना प्राधान्य दिलं जातं, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
हे पण वाचा : ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर!
त्यामुळेच यंदा त्यांनी थेट भूमिका घेत, डीजे वाजवणाऱ्या मंडळांना मदत न करण्याचा निर्णय जाहीर केला. “उत्सव पवित्र राहायला हवा. ढोल-ताशा, भजन, पारंपरिक वाद्यं, सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून एक आदर्श साजरा करता येतो. पण फक्त ध्वनीप्रदूषण, गोंगाट आणि संस्कृतीभंग करून आपली परंपरा झाकोळली जाऊ नये. म्हणूनच आम्ही आता मदतीला अट घालतोय,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
