पुण्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर! मनसेचा महापालिकेला थेट इशारा
Dangerous Buildings Pune
Dangerous Buildings Pune : पुण्यातील मध्यवर्ती भागांतील जुने वाडे, इमारतींना नवजीवन देण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास सुरू आहे. मात्र या प्रक्रियेत धोकादायक इमारतींच्या पाडकामावेळी कोणतेही स्पष्ट धोरण किंवा सुरक्षिततेचे निकष पाळले जात नसल्याने नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. यावर लक्ष वेधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महापालिकेकडे ठोस आणि कठोर नियमावलीची मागणी केली आहे.
मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन या मागण्यांचे निवेदन दिले. “पुनर्विकासाच्या नावाखाली सुरु असलेल्या पाडकामांमुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. आवाज, धूळ आणि अपघातांचा धोका वाढत चालला आहे,” असे मनसेने यावेळी ठणकावून सांगितले.
संभूस यांनी सांगितले की, “महापालिकेच्या बांधकाम परवानग्या देण्याची प्रक्रिया व्यवस्थित आहे, मात्र पाडकामाच्या बाबतीत कोणतीही नियमबद्धता नाही. परिणामी, अनेक ठिकाणी इमारती सर्रासपणे कोसळवल्या जात आहेत, ज्याचा थेट फटका शेजारी राहणाऱ्या नागरिकांना बसतो.”
मनसेने यावेळी काही ठोस उपाय सुचवले आहेत. त्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि वाहतूक पोलिसांचे NOC सक्तीचे करणे, धुळीवर नियंत्रणासाठी पाण्याचा वापर व ध्वनीरोधक साउंड बफर बसवणे, शेजारच्या इमारतींचे संरक्षण करणे, सात दिवसांपूर्वी नागरिकांना लेखी सूचना देणे, केवळ प्रशिक्षित आणि मान्यताप्राप्त एजन्सींनाच पाडकामाची जबाबदारी देणे तसेच राडारोडा वाहतूक रात्रीच करणे, यासारख्या अटींचा समावेश आहे.
हे पण वाचा : राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय! लाखो नागरिकांना मिळणार आपल्या हक्काची जमीन
तसेच प्रत्येक पाडकामावर स्वतंत्र पर्यवेक्षकांची नेमणूक करावी, अशी आग्रही मागणी मनसेने केली आहे. शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे घनदाट वस्तीच्या भागांमध्ये ही कामे अत्यंत काळजीपूर्वक केली गेली पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसेने प्रशासनाला इशारा दिला की, जर वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर पक्ष रस्त्यावर उतरेल आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आंदोलन छेडेल.
